सत्तासंघर्षाचा निकाल उद्या जाहीर होणार
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली आहे. न्यायालयाने सत्तासंघर्षाबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालय उद्या (गुरुवार) यावर निकाल देणार आहे, याबाबतची घोषणा स्वत: सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केली आहे. सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.सत्तासंघर्षावरील निकाल उद्या लागणार असल्याची घोषणा सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा उद्याचा निकाल भारताची लोकशाही समृद्ध करणारा असेल, हा निकाल आमच्याच बाजुने लागेल, अशी आम्हाला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी फोनवरून संवाद साधत होते.
“…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान
ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असा अंदाज उल्हास बापट यांनी व्यक्त केला. तसेच परिस्थिती पूर्ववत करत आधीच्या मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसवण्याचा निर्णय याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते बुधवारी (१० मे) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.उल्हास बापट म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या निलंबनाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला तर कायदा स्वच्छ आहे आणि त्यानुसार तो निर्णय घ्यायचा अधिकार आत्ताच्या अध्यक्षांना असेल. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी जे सत्र बोलावलं ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार बोलावलं नव्हतं म्हटलं आणि तो आदेशच चुकीचा ठरवला तर त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. कारण उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्र बोलावल्यावर राजीनामा दिला होता.”
सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधीच एकनाथ शिंदे राजीनामा देतील? शिंदे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. येत्या एक-दोन दिवसात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली.असीम सरोदे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय सोडून इतरांनी बोलणं चुकीचं आहे. वकिलांच्या विधानावर अंदाज बांधणं योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार, याचा अंदाज लावणं कुणालाही शक्य नाही, अशी प्रतिक्रिया शहाजीबापू पाटील यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
भाजपा, काँग्रेस की जेडीएस? कर्नाटकमध्ये कोण मारणार बाजी?
कर्नाटकमध्ये आज (१० मे ) विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान पार पडलं. आता कर्नाटकमध्ये भाजपा किंवा काँग्रेसची एकहाती सत्ता येणार की जेडीएस किंगमेकर ठरणार? हे १३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी अनेक जनमत कल (एक्झिट पोल) जाहीर होत आहेत. या जनमत चाचणीमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसला किती जागा मिळेल यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
झी न्यूज आणि मॅट्राईजच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
भाजपा : ७९ – ९४
काँग्रेस : १०३ – ११८
जेडीएस : २५ – ३३
अन्य : २-५
“ममता बॅनर्जी धैर्यवान महिला, त्यांनी पंतप्रधान बनायला हवं”, भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामींचे विधान
भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रह्मण्यम स्वामी यांनी कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलत असताना एक मोठे विधान केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी देशाचे पंतप्रधान बनावे, असे वक्तव्य स्वामी यांनी केले. खरेतर भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळे स्वामी यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, “ममता बॅनर्जी अशा नेत्या आहेत, ज्यांना धमकावणे सोपे नाही. त्या धैर्यवान, धीट महिला नेत्या आहेत. त्यांनी ३४ वर्ष कम्युनिस्टांसोबत संघर्ष केला. ममता बॅनर्जी या देशाच्या पंतप्रधान व्हायला हव्यात.”
होर्डिंग दुर्घटनेबाबत दोषींवर कारवाई करण्याबाबतचे पत्र ठेवले लपून? पिंपरी चिंचवड पालिकेचा प्रताप
मागच्या महिन्यात पिंपरी चिंचवड शहरात रस्त्याच्या कडेला उभारलेलं होर्डिंग कोसळून त्याखाली चिरडल्या गेल्याने पाच नागरिकांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची शासनाच्या नगर विकास खात्याने गंभीर दखल घेतली होती. सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याबाबतचे लेखी आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. मात्र, शासनाच्या आदेशाला महापालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.शासनाचे आदेश येऊन आठ दिवस झाले तरी देखील महापालिका प्रशासनाने एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई तर केलीच नाही. शिवाय नगर विकास खात्याकडून आलेले आदेशाचे पत्र देखील उघड होऊ दिलं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
SD Social Media
9850 60 3590