शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात ठाण्याच्या कापुरबावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आपल्या जीवाला धोका असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांनी एका गुंडाला सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ‘ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे’, असं संजय राऊत फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले.
संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. ‘सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेले धमकीचे आरोप हे फक्त कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी, तसंच सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे, याची सखोल चौकशी गृह विभागामार्फत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
राऊतांच्या जबाबात धक्कादायक माहिती
संजय राऊत यांच्या आरोपांनंतर ठाणे पोलीस संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यासाठी गेले होते. संजय राऊत यांच्या प्राथमिक चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजा ठाकूर मार्फत खासदार श्रीकांत शिंदे यांनी हल्ल्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. ऐकीव माहितीच्या आधारे हा आरोप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘माझ्यावर राजा ठाकूर हल्ला करणार, तसंच शाई फेकणार अशी माहिती माझ्या विश्वासू मित्राने दिली होती. मी राजा ठाकूरला कधी भेटलेलो नाही, का त्याने कधी मला फोन केला नाही. मी त्याला कधी पाहिले नाही. काही लोकांमध्ये चर्चा झाली, ती चर्चा माझ्यापर्यंत आली म्हणून मी त्याबाबत पोलिसांना सांगितलं,’ असं संजय राऊत पोलिसांना म्हणाले.
प्राथमिक चौकशीदरम्यान संजय राऊतांनी हे सांगितल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ठाणे पोलिसांची एक टीम नाशिकला संजय राऊत यांचा जबाब नोंदवायला गेली होती. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत, यामुळे ठाणे पोलिसांची टीम त्यांचा जबाब नोंदवायला गेली होती.