‘सभा सुरू होणार म्हणून मी कुणावर तोफ डागणार अशा बातम्या रंगल्या आहे, पण ढेकणांना चिरडण्यासाठी तोफ लागत नाही’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट अशी सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसंच पाणी प्रश्नावरही भाष्य केलं.
आज जवळपास माझी शस्त्रक्रियानंतर सहा महिन्यांनी मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलं आहे. पहिलं पाऊल हे शिवसेनाप्रमुखांच्या आवडत्या संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. जिथे जिथे नजर जाते तिथे लोकच लोकं आहेत. आज मराठवाड्यात शिवसेनेने पहिलं पाऊल टाकलं होतं ती आजची तारीख. ती केव्हाची सभा होती ते मला आठवत नाही. औरंगाबाद महापालिकेची सभा झाल्यानंतर ती सभा झाली होती. मी व्यासपीठावरुन नाही तर संभाजीनगरच्या कोणत्यातरी गच्चीवरुन सभा पाहत होतो. आणि आज एवढी वर्ष झाली तरी मैदान भरलेलं आहे. आजसुद्धा तोच जल्लोष आणि उत्साह आहे.
‘कुठेही काही कमी नाही. अजूनही शिवसैनिकांची झुंड येत आहे. मी आज आपल्या रुपामध्ये तुळजाभवानी आईचं दर्शन घेतलं आहे. मी येताना काही काळ हॉटेलमध्ये टीव्हीमधील सभेचे दृश्य बघत होतो. आकाशातून सभा कशी दिसतेय ते बघत होतो. देव आपली सभा कशी बघत असतील ते बघत होतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, मुख्यमंत्री कोणावर निशाणा साधला? अशा बातम्या सुरू होत्या. शिवसेनाप्रमुख सांगायचे की ढेकणं चिरडायला तोफेचे गरज नसते. ही ढेकणं आम्ही असेच चिरडत असतो. त्यासाठी शिवसैनिकांची शक्ती वाया घालवायची नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.