अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये आहे. प्राजक्तानं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री, डान्सर, उत्तम निवेदिका आणि आता होत असलेली यशस्वी उद्योजिका म्हणून प्राजक्ता माळी हे नाव पुढे येत आहे. प्राजक्ताच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिच्या आई वडिलांचा मोठा वाटा आहेच मात्र त्यानंतर तिच्या गुरूंचाही यात मोलाचा वाटा आहे. प्राजक्ता माळी श्री श्री रवीशंकर यांना आपले गुरू मानते. यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्तं ती बिझी शेड्यूलमधून वेळ काढून श्री श्री रवीशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात गेली होती. बरं आश्रमात गेल्यानंतर प्राजक्ताला एक महत्त्वाचा प्रश्न सतावू लागला आणि मग तिनं त्याचं उत्तर थेट श्री श्री रवीशंकर यांनाच विचारलं.
प्राजक्तानं श्री श्री रवीशंकर यांच्या आश्रमात जाऊन तिथे काही दिवस मुक्काम केला. आश्रमातील फोटो आणि व्हिडीओ तिनं शेअर केले आहेत. आश्रमात अनेक देशातील, राज्यातील लोक आले होते. तसंच विवाहीत, अविवाहीत, तरूण, ज्येष्ठ असे लोक तिथे होते. तिथं गेल्यावर प्राजक्ताला लग्न करणं गरजेचं आहे का? असा प्रश्न पडला. तिनं हा प्रश्न थेट श्री श्री रवीशंकर यांना विचारला. श्री श्री रवीशंकर यांनी तिच्या प्रश्नाचं फार सुंदर आणि आवर्जुन प्रत्येकानं ऐकावं असं उत्तर दिलं.
हजोरोंच्या गर्दीत प्राजक्तानं श्री श्री रवीशंकर यांना विचारलं की, ‘लग्न करणं खरचं गरजेचं आहे का?’ यावर मिश्किल उत्तर देत रवीशंकर म्हणाले, ‘तुम्ही हा प्रश्न मला विचारताय. असं असतं तर माझ्या बाजूला आणखी एक खुर्ची लागली असती. डबल सोफा लावावा लागला असता. लग्न केलंच पाहिजे याची काही गरज नाहीये. खुश राहणं ही गरज आहे. तुम्ही लग्न करून खुश राहा किंवा लग्न न करता खुश राहा’.
श्री श्री रवीशंकर पुढे म्हणाले, ‘काही लोक लग्न करूनही दु:खी असतात तर काही लोक लग्न न करताही दु:खी असतात. दुसरे लोक असतात की जे लग्न न करताही खुश असतात आणि लग्न करूनही खुश असतात. दुसऱ्यांनाही ते आनंद देत असतात. हे तुम्ही ठरवा. तुम्हाला काय आवडंत. मला वाटतं की आनंदी राहण्याचा पर्याय सर्वांनी निवडायला हवा’.
प्राजक्तानं श्री श्री रवीशंकर यांना विचारलेला हा प्रश्न आणि त्याचं त्यांनी दिलेल्या सुरेख उत्तराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा प्रश्न त्यांना विचारल्याबद्दल प्राजक्ताचं कौतुक देखील करण्यात येत आहे.