महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना पुन्हा डोकंवर काढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचा हाहाकार बघायला मिळतोय. विशेष म्हणजे नागपूर शहरातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरमध्ये एका खासगी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नागपूरमध्ये आज दिवसभरात तब्बल 262 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे देखील धाबे दणाणले आहेत. कोरोना संसर्गाचा वाढता वेग पाहता प्रशासन कामाला लागलं आहे. पण ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात येत आहे.
नागपुरात कोरोनाने कहर केला आहे. नाही नाही म्हणता कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून रविवारी तब्बल 262 जण बाधित झाले आहेत. यात हिंगणा रोड येथील जयताळा भागातील राय इंग्लिश स्कूलमधील 38 विद्यार्थी कोरोनाबाधित निघाले आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी या शाळेचे विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याची माहिती दिली आहे. संबंधित शाळेतील मुलांची १५ जुलैला आरटीपीसीआर करण्यात आली. त्यानंतर १६ जुलैला नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. रविवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे जोशी यांनी सांगितले.
दरम्यान, सरसकट कोणत्याही शाळेची तपासणी करण्यात येणार नाही. पालकांनी आणि शाळा संचालकांनी विनंती किंवा मागणी केल्यास नमुने घेण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी स्पष्ट केले.
‘शाळा बंद ठेवणार’
राय इंग्लिश स्कूलचे संचालक डॉ. एम. एम. राय यांनी शाळा बंद ठेवणार असल्याचे सांगितले. शाळेतील शिक्षकांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आम्ही सर्व मुलाच्या पालकांना मुलांची आरटीपीसीआर करायला सांगणार आहोत. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्यावरच शाळेत प्रवेश देऊ. त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होऊ देणार नाही असे राय यांनी सांगितले.
नागपुरात ३ जुलैपासून कोरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २ जुलै रोजी ९५ बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर ३ जुलै रोजी १०५ बाधितांची नोंद झाली. ५ जुलै : १३५, ६ जुलै : ९६, ७ जुलै : ११८, ८ जुलै : १३८, ९ जुलै : १२६, १० जुलै : १२८, १२ जुलै : १४६, १३ जुलै : १९४, १४ जुलै : १४०, १६ जुलै : १७६ आणि रविवार १७ जुलै रोजी एकदम २६२ कोरोना बाधित निघाले. यात शहरातील १६२, ग्रामीणमधील १०० बाधितांचा समावेश आहे.