महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्तेत येताच महाविकास आघाडीला एकामागेएक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच गेल्या सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमधील सर्व निर्णय रद्द केले. त्यानंतर त्यातील काही निर्णय पुन्हा एकदा घेतले. यामागे त्यांनी कायदेशीर बाबींचं कारण दिलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार काळात अर्थ विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या निधीला स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जातोय. कारण अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्यांनीच संबंधित निधी मंजूर केला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना झटका देणारा मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना नगर विकास विभागातून मंजूर केलेल्या 941 कोटींच्या निधीला एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जातोय. एकनाथ शिंदे यांनी स्थगित केलेल्या 941 कोटींच्या निधीपैकी सर्वाधिक निधी हा अजित पवार यांच्या बारामती नगरपरिषदेसाठी देण्यात आलेला होता.
विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांनी मंजूर केलेला 941 कोटींचा निधी रोखण्याची पहिली बातमी नाही. कारण गेल्या आठवड्यात अशीच एक बातमी समोर आली होती. शिंदे सरकारनं 2022-23 या आर्थिक वर्षामधील जिल्हा विकास प्रकल्पांअंतर्गत देण्यात येणारा निधी रोखण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल 13 हजार 340 कोटींचा हा निधी आहे. अजित पवार यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागासाठी हा निधी मंजूर केला होता. पण, शिंदे सरकारनं त्याला स्थगिती दिली. नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत हा निधी दिला जाणार नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केल्याचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ नं दिलं होतं.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना शिवसेना आमदारांची निधीच्या मुद्द्यावरुन नाराजी होती. राज्याचं अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं. अजित पवार त्या खात्याचे प्रमुख होते. पण त्यांच्याकडून शिवसेना आमदारांना पुरेसा निधी दिला जात नाही, असा आरोप शिवसेना आमदारांकडून केला जात होता. शिवसेना आमदारांनी अनेकदा आपली नाराजी पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली होती. याशिवाय काँग्रेसचे आमदारही या मुद्द्यावरुन नाराज असल्याची चर्चा होती. पण अजित पवारांनी या आरोपांचं खंडन केलं होतं.