आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 16 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्याचं आयोजन मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर करण्यात आला आहे. गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात पंजाब किंग्जचा अनुभवी फलंदाज शिखर धवनने एक खास विक्रम केला आहे. शिखर हा T20 कारकिर्दीत एक हजार चौकार पूर्ण करणारा हा जगातील पाचवा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. धवनने वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर चौकार मारून हा विक्रम केला. धवनने एकूण 35 धावांची खेळी केली.
T20 मध्ये सर्वाधिक चौकार –
ख्रिस गेल – 1132
अॕलेक्स हेल्स – 1054
डेव्हिड वॉर्नर – 1005
अॕरॉन फिंच – 1004
शिखर धवन – 1001
T20 मध्ये सर्वाधिक चौकार मारणारे भारतीय –
शिखर धवन – 1001
विराट कोहली – 917
रोहित शर्मा – 875
सुरेश रैना – 779
गौतम गंभीर – 747
धवन आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा बॅट्समन आहे. धवनला या मोसमात 6000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. धवनने 6 हजार धावांचा टप्पा पार केल्यास तो विराट कोहलीनंतरचा दुसरा फलंदाज ठरू शकतो. या सामन्यापूर्वी धवनने 195 आयपीएल सामन्यांमध्ये 34.77 च्या सरासरीने 5 हजार 876 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 2 शतकं आणि 44 अर्धशतकं झळकावली आहे.
धवनने आयपीएलच्या गेल्या 3 हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले. मात्र या वेळेस पंजाब किंग्सने शिखर धवनला 8 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं.