आंदोलन झालं त्यावेळी शरद पवार सिल्व्हर ओकवर होते. यानंतर पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना तिथून बाहेर काढलं. या प्रकरणावर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत, चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. चुकीचा रस्ता कुणी दाखवत असेल तर त्या रस्त्याला विरोध करणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. संकट आलं की आपण सर्व एक आहोत हे तुम्ही दाखवून दिले.
नेता चुकीचा असला तर काय होतं, हे आजच्या आंदोलनातून दिसलं. महाराष्ट्रात राजकारणात वझीर असतात, संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. गेले काही दिवस आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा जो प्रयत्न होत होता तो शोभनीय नव्हता असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
कर्मचारी आणि आपला पक्ष यांचे घनिष्ट संबंध होते. गेली 40-50 वर्षे एसटी कर्मचाऱ्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडून चुकलं नाही. ज्या ज्या वेळेस प्रश्न निर्माण झाले त्या त्या वेळी प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांनी कष्ट घेतले, पण त्यांना चुकीचा रस्ता दाखवला त्याचे हे दुष्परिणाम आहेत.
कारण नसताना घरदार सोडून बाहेर राहिला. त्यामुळं त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले. हेच नेतृत्व टोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण केली आणि हेच नेतृत्व आत्महत्या आणि तत्सम गोष्टींना जबाबदार आहे. यातून जे नैराश्य त्यातून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.