भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (३१ मे) जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या हंगामाचा दिलासादायक अंदाज जाहीर केला. मात्र, मोसमी पावसाची अरबी समुद्रातील शाखा केरळपर्यंत धडकली असून तिने पुढे प्रवास केल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजावर ‘स्कायमेट’ या खासगी हवामान अभ्यासक आणि अंदाजक कंपनीने आक्षेप घेतल्यामुळे नवा गोंधळ निर्माण झाला आहे.
पावसाचे भाकित जाहीर करताना आणि मोसमी वाऱ्यांची स्थिती स्पष्ट करताना भारतीय हवामान खात्याने घाई केली असून, प्रत्यक्षात केरळमध्ये मोसमी पाऊस अद्याप दाखलच झाला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यंदा आरंभी पडणारा पाऊस पूर्वमोसमी की मोसमी याबाबत सामान्य नागरिकांचा घोळ होण्याची शक्यता अधिक आहे.
हवामान विभागाने यापूर्वी १४ एप्रिलला मोसमी पावसाच्या हंगामाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार देशात सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, सध्याची हवामानाची स्थिती, हिंद महारासगातील तापमानाची स्थिती लक्षात घेता पावसाच्या प्रमाणाचा अंदाज वाढवून मंगळवारी तो १०३ टक्के करण्यात आला. त्यात चार टक्के कमी-अधिक होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. १९७१ ते २०२० या कालावधीत भारतात पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेमी आहे. या सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस मोसमाच्या चार महिन्यांत १०३ टक्के पाऊस देशात पडणार आहे. मुंबई, ठाण्यासह किनारपट्टीच्या तुरळक भागांत पुणे, नाशिकसह उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात आणि औरंगाबाद, बीडसह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पाऊस सरासरीच्या तुलनेत अधिक असेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.