ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा महिला टी२० वर्ल्ड कप जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बेथ मूनीच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ६ बाद १५६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्किकेला १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाचं हे एकूण सहावं विजेतेपद आहे.दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोव्लार्डटने ४८ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. यात तिने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. मात्र मोक्याच्या क्षणी बाद झाल्यानं दक्षिण आफ्रिकेवर दबाव वाढला. लॉरा बाद झाल्यानतंर त्यांच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या.
ऑस्ट्रेलियाची सलामीची बॅटर बेथ मूनीने अंतिम सामन्यात जबरदस्त खेळी केली. तिने ५३ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह ७४ धावा केल्या. तर गार्डनरे २९ आणि एलिसा हिलीने १८ धावांची खेळी केली.ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सहावेळी महिला टी२० वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलंय. २०१० मध्ये न्यूझीलंडला धूळ चारत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानतंर २०१२ आणि २०१४ मध्ये सलग दोन वेळा इंग्लंडला हरवून त्यांनी वर्ल्ड कप जिंकण्याची हॅटट्ट्रिक केली.
२०१६ मध्ये वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाची विजयी चौकार लावण्याची संधी हिरावून घेत विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर २०१८, २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावलं होतं.