राज्यभरातील किसानपुत्रचे 19 मार्चला आंदोलन

राज्यभरातील किसानपुत्र पुन्हा एकदा आक्रमक झालेत. त्यांनी 19 मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलीय. या आंदोलनात जवळपास 20 जिल्ह्यातून आलेले किसानपुत्र सहभागी होणार आहेत. शेतकरी आत्महत्या या राष्ट्रीय आपत्ती मानून रोखाव्यात. यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केलीय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज होत आहेत. आतापर्यंत देशात जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. असे असताना, राज्य असो वा केंद्र सरकार त्याकडे गंभीरपणे लक्ष देत नाही. शेतकरी आत्महत्यांना राष्ट्रीय आपत्ती मानले पाहिजे व एकाही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.

शेतकरी आत्महत्या हा पुढे ढकलण्या सारखा विषय नाही. इतर सगळी कामे बाजूला ठेवून ‘शेतकरी आत्महत्या’ हा विषय सरकारने अग्रक्रमाने विचारात घेतला पाहिजे, अशी मागणी किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख आणि शेतकरी नेते अमर हबीब यांनी केली आहे.

अमर हबीब म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून, सरकारने पाडलेले खून आहेत. कारण शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण काही कायदे आहेत. ते मागच्या सरकारांनी आहेर केले व वर्तमान सरकार देखील ते कायदे रद्द करत नाही. कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग), आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण आदी नरभक्षी कायदे शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहेत. ते तत्काळ रद्द झाले पाहिजेत. हे कायदे पक्षपात करणारे आहेत. मुलभूत अधिकारात हस्तक्षेप करणारे आहेत. घटना विरोधी आहेत.

अमर हबीब म्हणाले की, शेतकरीविरोधी कायदे टिकून राहावे म्हणून आपल्या मूळ घटनेत नसलेले पण पहिली घटना दुरुस्ती करून टाकलेले 9 वे परिशिष्ट हे होय. या परिशिष्टात टाकलेल्या कायद्यांच्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही. म्हणून हे कायदे टिकून राहिले आहेत. परिशिष्ट 9 मध्ये आज 284 कायदे आहेत त्यापैकी 250 कायदे थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण हे कायदे या परिशिष्टात असल्यामुळे ते टिकून राहिले आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न गरिबीचा नसून गुलामीचा आहे. म्हणून शेतकऱ्यांना या कायद्यातून सोडवणे महत्वाचे आहे, असे किसानपुत्र आंदोलनाचे म्हणणे आहे.

अमर हबीब म्हणाले की, 19 मार्च 1984 रोजी साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. वीज बिल भरले नाही म्हणून त्याची वीज कपण्यात आली होती. ते वीज बिल भरू शकले नाहीत. जमीन विकायला काढली तर ग्राहक नाही. अशा परिस्थितीत साहेबराव यांना आत्महत्या करावी लागली. 2017 पासून किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने दरवर्षी 19 मार्च रोजी ‘अन्नत्याग आंदोलन’ केले जाते. या आंदोलनात महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील व विदेशात गेलेले किसानपुत्र देखील सहभागी होतात. लाखाहून अधिक लोक 19 मार्चला उपवास करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.