भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका : विंडीजविरुद्ध भारताचे दुसऱ्या सामन्यासह मालिका विजयाचे लक्ष्य

भारतीय संघाचे यजमान वेस्ट इंडीजविरुद्ध रविवारी होणारा दुसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचे लक्ष्य असेल. तसेच या सामन्यात भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पहिल्या सामन्यात तीन धावांनी निसटता विजय मिळवण्यात यश आले. या सामन्यात आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. तसेच त्यांना फटकेबाजी करण्यातही अपयश आले. त्यामुळे भारतीय संघ सहज ३५० धावांचा टप्पा गाठेल असे वाटत असतानाच त्यांना ५० षटकांत ३०८ धावांपर्यंतच मजल मारता आली. सूर्यकुमार यादव (१३ धावा), संजू सॅमसन (१२) आणि दीपक हुडा (२७) हे मधल्या फळीतील फलंदाज फारसे योगदान  देऊ शकले नाहीत. त्यामुळे अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

दुसरीकडे, विंडीजला गेल्या ४० सामन्यांत केवळ सातव्यांदा ५० षटके खेळता आली ही सकारात्मक बाब असली, तरी त्यांना अखेरीस पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना विजय अनिवार्य आहे.

सॅमसनकडे लक्ष

पहिल्या सामन्यात कर्णधार धवनला १८व्या एकदिवसीय शतकासाठी केवळ तीन धावा कमी पडल्या. तसेच शुभमन गिलने एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साकारले. श्रेयस अय्यरनेही अर्धशतकासह सूर गवसल्याची ग्वाही दिली. परंतु भारताला मधल्या फळीकडून मोठय़ा योगदानाची गरज आहे. पहिल्या सामन्यात भारताने यष्टीरक्षकाच्या स्थानासाठी इशान किशनऐवजी सॅमसनला पसंती दिली. सॅमसनने यष्टिरक्षणात प्रभावित केले; पण फलंदाज म्हणून तो अपयशी ठरला. तो १८ चेंडूंत केवळ १२ धावा करून बाद झाला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याचा चांगल्या कामगिरीचा मानस असेल. गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहलची भूमिका महत्त्वाची असेल. तसेच पहिल्या सामन्यात सात षटकांत ४३ धावा देत एकही बळी न मिळवणाऱ्या अक्षर पटेलला वगळून रवी बिश्नोईला संधी देण्याचा भारतीय संघ विचार करू शकेल.

फलंदाजांवर सातत्याचे दडपण

विंडीजच्या कायले मेयर्स, शमार ब्रूक्स आणि ब्रँडन किंग या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी पहिल्या सामन्यात अर्धशतके झळकावली. मात्र, सध्याच्या विंडीज संघातील फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता येत नसल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हा दृष्टिकोन बदलण्याचे त्यांच्यावर दडपण आहे. तसेच सलामीवीर शे होप, कर्णधार निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांचा कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजीत डावखुरा फिरकीपटू गुदाकेश मोटीने दोन बळी घेत प्रभावित केले. त्याला इतरांची साथ मिळणे गरजेचे आहे. करोनाग्रस्त जेसन होल्डर या सामन्यालाही मुकण्याची शक्यता आहे.

संघ

  • भारत : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक),शार्दूल ठाकूर, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
  • वेस्ट इंडिज : निकोलस पूरन (कर्णधार), शे होप (उपकर्णधार), शमार ब्रूक्स, ब्रँडन किंग, कायले मेयर्स, केसी कार्टी, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, कीमो पॉल, जेडन सील्स.
  • वेळ : सायं. ७ वा.
  • थेट प्रक्षेपण : फॅनकोड अ‍ॅप, डीडी स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.