हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचं निधन

वीरभद्र सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना 13 एप्रिल रोजी मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी कोरोनावरही मात केली होती. रुग्णालयातून ते घरीही आले होते. मात्र, घरी आल्यावर त्यांची पुन्हा प्रकृती बिघडली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आयजीएमसी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने आज पहाटे त्यांनी अंतिम श्वास घेतला.

वीरभद्र सिंह यांचा जन्म 23 जून 1934 रोजी राज घराण्यात झाला होता. त्यांचे वडील राजा पद्मसिंह हे बुशर रियासतचे राजा होते. वीरभद्र सिंह हे नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तर पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शिवाय सहा वेळा ते मुख्यमंत्री बनले होते. यूपीए सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रीपद भूषविलं होतं. त्यांनी केंद्रात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळलं होतं. सध्या ते सोलन जिल्ह्यातील अरकी येथील आमदार होते.

वीरभद्र सिंह यांच्या निधनावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. वीरभद्र सिंह यांनी देवभूमीला नव्या ऊंचीवर नेऊन ठेवलं होतं. त्यांच्या निधनामुळे देशाचं आणि काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, खासदार सुरेश काश्यप, मुख्यमंत्री जयराम ठाकूर आदी नेत्यांनीही सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.