लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील हातनूर गावातल्या गणेश साबळे या पेरू उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 200 टन पेरु खराब झाले आहेत.
परिणामी या शेतकऱ्याचे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गणेश साबळे या शेतकऱ्याने साडेपाच किलोमीटर वरून पाईप लाईन करत गतवर्षी आपल्या पाच एकर शेतीत पेरूची लागवड केली होती. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्याच्या पेरुला मागणीच उरली नाही.
परिणामी दररोज एक क्विंटल पेरू फेकून द्यावा लागत आहे. सध्या या शेतकऱ्याच्या शेतातील हिरव्या गार पेरुच्या बागेत टुमदार पेरुची फळे लगडली आहेत.
मात्र मागणी नसल्यामुळे हे पेरू झाडावरच जाळून जाऊ लागले आहेत. त्यामुळे हा पेरू उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
मायबाप सरकारने लॉकडाऊन काळात शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीकडे लक्ष द्यावं आणि त्यांना मदत करावी, अशीच अपेक्षा आता व्यक्त होत आहे.