आज दि.३ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

‘लाजिरवाणं… याला जबाबदार कोण?’; ओडिसा ट्रेन अपघातावर विवेक अग्निहोत्रींचा सवाल

ओडीसामधील बालासोर येथे 2 जून रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. तीन ट्रेन एकमेकांना धडकून झालेल्या या अपघातात आतापर्यंत 233 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मागील अनेक तासांपासून या ठिकाणी रेक्स्यू ऑपरेशन सुरू आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  संपूर्ण देशभरात या घटनेमुळे दु:ख व्यक्त केलं जात आहे. बॉलिवूड कलाकरांनी देखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.  अभिनेता सलमान खान पासून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या घटनेबाबत ट्विट शेअर केलं आहे.

अभिनेता सलमान खानने ट्विट करत म्हटलंय, “अचानक या भीषण अपघाची माहिती मिळाली. या घटनेमुळे आम्ही देखील अस्वस्थ झालो आहोत. अपघातात मरण पावलेल्या सगळ्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देओ. जखमी झालेल्यांची काळजी घ्या. जखमी झालेल्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या त्रासातून बाहेर येण्याची ताकद मिळो”. द काश्मीर फाइल्स सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित केलेत. ट्विट करत त्यांनी लिहिलंय, “ट्रॅजिक आणि लाज वाटावी अशी घटना आहे. आजच्या जगात एकसाथ 3 ट्रेनचा अपघात कसा काय होऊ शकतो. याची जबाबदारी कोणाची? दुर्घटनाग्रस्त लोकांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. ओम शांती”.

 ‘कर्तव्य’दक्ष! खाकी वर्दीतील सावित्रींनी अशी केली वटपूजा

पतीच्या दीर्घायुष्य व हाच पती जन्मोजन्मी मिळावा यासाठी आज खाकी वर्दीतील महिला पोलिसांनी कर्तव्यातून वेळ काढत वडाच्या झाडाची पूजा केली. रुढीपरंपरेला जपत उखाणे घेत पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाला साकडे घाणाऱ्या खाकी वर्दीतील या सावित्री लोकाभिमुख ठरल्या हे मात्र विशेष.घरसंसार सांभाळत महिलांना नोकरीच्या ठिकाणी कर्तव्य पार पाडावे लागते. अशातच येणारे सण, रुढीपरंपरा जपणं कठीण जातं.मात्र, त्यातही थोडा वेळ काढीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस मुख्यालयातील वडाच्या झाडाची पूजा केली.पोलीस म्हटलं की कामाचा वाढता ताण, त्यातूनही वेळ काढून पतीच्या सुखासाठी वडाच्या झाडाखाली येऊन पूजा करणं, यातच खरा आनंद असल्याची भावना या महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

‘..तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री असते’ राष्ट्रवादीच्या आमदाराने मनसेला डिवचलं

नुसतं भाषण देऊन झालं असतं तर राज ठाकरे आज मुख्यमंत्री झाले असते. त्यांचे 15 चे 50 आमदार झाले असते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे दोन दिवसीय शिबीर नागपुरात होत आहे. त्याचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अमोल मिटकरी यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांवर टीका केली.

डॉ. तात्याराव लहाने यांच्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

ज्येष्ठ डॉ तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्यसरकार कडून मंजूर करण्यात आला आहे. डॉ. तात्याराव लहाने अखेर पदमुक्त झाले आहेत. त्यामुळे जे जे हॉस्पिटल मधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन आता थांबणार का? हे पाहणं आता महत्त्वाच ठरणार आहे. बुधवारी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह जे. जे. रुग्णालयातील नऊ डॉक्टरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अशात आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास जे. जे रुग्णालय प्रश्नी मार्डने सोमवारपासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिला होता.

“अनेक बंदुका माझ्या खांद्यावर…”, नाराजी आणि पक्षांतराच्या चर्चांवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या पक्षांतराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विरोधकांकडून याच मुद्द्यावर भाजपावर टीका होत आहे, तर दुसरीकडे भाजपा नेत्यांकडून पंकजा मुंडे नाराज नसल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता स्वतः पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर भाषण करताना या घडामोडींवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच सर्व माध्यमांना बोलावेल आणि समोर बसून बिनधास्त भूमिका जाहीर करेन. कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेऊन बंदूक चालवण्याएवढे खांदे अजून तरी मला मिळाले नाहीत. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी इतकी आहे की, अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसावण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, त्या बंदुकांना मी माझ्या खांद्यावर विसावू देणार नाही.”

बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी बोर्डाकडून महत्त्वाची बातमी

बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची भविष्यातील शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालये आणि विद्यापीठांनीही प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. तथापि, अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत संघर्ष करावा लागतो. काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहितीचे तुकडे अधूनमधून गहाळ होऊ शकतात. परंतु जर गोंधळ न करता प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश केला तर विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांकडे काही महत्त्वाची कागदपत्रे तयार असतील तर त्यांना काळजी करण्याची गरज नाही.

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकर परिसरात शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते किल्ले रायगडावर ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळय़ादरम्यान बोलत होते. रायगडप्रमाणे प्रतापगडाच्या संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार उदयनराजे भोसले असतील, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले.लंडनच्या संग्रहालयात असलेली भवानी तलवार आणि वाघनखे भारतात परत आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पत्रव्यवहारही सुरू केला आहे. या पाठपुराव्याला यश येईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. राज्य सरकार शिवाजी महाराजांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून काम करत आहे. एक लोकाभिमुख शासन देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते या वेळी म्हणाले.

ग्राहकांपर्यंत Damage Products पोहचू नये यासाठी Amazon ने लढवली शक्कल

Amazon ही जगातील सर्वात लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट्सपैकी एक आहे. आजकाल बहुसंख्य लोक या साइटवर विविध गोष्टी खरेदी करत आहेत. पण कधी कधी अ‍ॅमेझॉनवर ऑर्डर केलेली वस्तूमध्ये दोष असल्याचे पाहायला मिळते. या Damage Products मुळे अ‍ॅमेझॉन कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी कंपनीने Artificial Intelligence ची मदत घ्यायचे ठरवले आहे. सध्या AI टेक सर्वत्र पाहायला मिळत आहे. लोक वेगवेगळ्या ठिकाणी या तंत्राचा वापर करत आहेत. ही अशी एकूण पार्श्वभूमी असताना अ‍ॅमेझॉनने घेतलेल्या या निर्णयाने लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, सदोष गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहचू नये यासाठी ही कंपनी त्यांच्या प्रत्येक वेअरहाऊसमध्ये टेस्टिंगसाठी AI टेकचा वापर करणार आहे.

इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी, ९३ वर्षानंतर मोडला सर डॉन ब्रॅडमनचा विक्रम

आर्यलॅंडविरोधात होत असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटने इतिहास रचला आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन डकेटने १८२ धावांची शतकी खेळी केली. डकेटने १५० चेंडूत १५० धावा केल्या. त्याने अशी कामगिरी करून सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला आहे. बेन लॉर्ड्सच्या मैदानात सर्वात वेगवान १५० धावा करणारा फलंदाज बनला आहे. याआधी हा विक्रम ब्रॅडमन यांच्या नावावर होता. ब्रॅडमनने १९३० मध्ये लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात १६६ चेंडूत १५० धावांची खेळी केली होती. म्हणजेच डकेटने लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे आणि ९३ वर्षांचा जुना विक्रम मोडून इतिहास रचला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.