आयकर विभागाने महाराष्ट्र आणि गोव्यातील एका व्यापाऱ्याच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकलेत. ज्या ग्रुपवर छापे टाकण्यात आलेत ते स्टील उत्पादक आहेत. तसेच ते पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोव्याशी संबंधित आहेत. आयकर विभागाने 44 हून अधिक ठिकाणी छापेमारी केलीय. आयकर विभागाने छाप्यादरम्यान सर्व बनावट कागदपत्रे, बिले, इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केलेत. जीएसटी प्राधिकरण पुणेच्या व्हेईकल ट्रॅकिंग अॅपद्वारे ई-वे बिलेदेखील जप्त केलीत. अद्यापही त्या व्यापाऱ्याचं नाव उघड झालेलं नाही.
आयकर विभागाला आतापर्यंत त्या ग्रुपकडून झालेल्या 160 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे पुरावे सापडलेत. पुढील तपासात ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या आयकर अधिकारी घोटाळ्याच्या तपासात गुंतलेले आहेत. आतापर्यंत साडेतीन कोटी रुपयांच्या वस्तूंची माहिती आणि सुमारे 4 कोटी रुपयांच्या अतिरिक्त साठ्याची माहिती प्राप्त झालीय. मालमत्तेतील गुंतवणुकीसह 3 कोटी रुपयांची रोकड, 5.20 कोटी रुपयांचे दागिनेही वेगवेगळ्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेत.
आयकर विभागाने 1.34 कोटी रुपयांच्या 194 किलो चांदीच्या वस्तूही जप्त केल्यात. आतापर्यंतच्या तपासात 175.5 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केलीय, ज्यात दागिने आणि रोख रकमेसह बोगस खरेदी केल्याचं कागदपत्रांवरून आढळून आलंय. सध्या आयकर विभागाचे छापे आणि तपास सतत सुरू आहे.
दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सरकारी मालकीच्या एमएमटीसीकडून कथित फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीच्या संबंधात एक ज्वेलरी कंपनीची 363 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केलीय. एमबीएस ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, एमबीएस इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड, सुकेश गुप्ता, अनुराग गुप्ता, नीतू गुप्ता, वंदना गुप्ता आणि त्यांच्या ग्रुप युनिट्सच्या 45 अचल मालमत्ता मनी लाँड्रिंग विरोधी कायद्याअंतर्गत तात्पुरत्या जप्त करण्यात आल्यात..