औरंगाबाद येथे तरुणींच्या छेडछाडीच्या दोन घटना ताज्या असताना पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात दोन सराईत बाल गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी पीडितेला धमक्या देवून वारंवार अत्याचार केला.
कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी द्यायचे
आरोपींनी पीडितेवर अत्याचार करताना मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर ते मुलीला तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी द्यायचे. अशाच प्रकारची धमकी देवून त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीवर अनेकदा सामूहिक बलात्कार केला.
आरोपींकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने आपल्या कुटुंबियांनी याबाबत तक्रार करु, असं सांगितलं असता आरोपींनी पीडितेला तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता प्रचंड घाबरली होती.
पोलिसांनी याप्रकरणी दोन बाल गुन्हेगार आणि एका सज्ञान आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींपैकी एका बाल गुन्हेगाराला ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे आरोपी दोन बाल गुन्हेगारांवर पूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पीडिता आणि तिचे कुटुंबिय आरोपींच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यास घाबरत होते.
अखेर पोलिसांनी पीडितेचं आणि कुटुंबियांचं समुपदेशन केलं. पोलिसांनी गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर कुटुंबियांनी आरोपींविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.