भाजपकडून ईडी आणि सीबीआयच्या धमक्या दिल्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या धमक्यांची खिल्ली उडवली आहे. आम्ही ईडीच्या कारवाईचं स्वागतच करतो. कारण त्याचा आम्हालाच फायदा होतो, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला आहे.
राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बैठकीसाठी सुप्रिया सुळे नागपुरात आल्या होत्या. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी भाजपला टोले लगावले. भाजपकडून ईडी, सीबीआयच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडीच्या कारवाईचं मी मनापासून स्वागत करते. राष्ट्रवादीला ईडीचा नेहमीच फायदा झालाय, असा चिमटा सुप्रिया सुळेंनी काढला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी इतकं इम्पलसिव्हली आयुष्य जगत नाही. कोणी काही बोललं तर मी थोडासावेळ विचार करते. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही. माझं आयुष्य वास्तव आहे. त्यामुळे मी इन्स्टंट कॉफी पित नाही. मात्र, ठाकरे-फडणवीस भेटीची मला माहिती नाही. सर्व पक्षाचे नेते निवडणुका सोडून आपले वैयक्तिक संबंध चांगले ठेवत असतील तर त्याचं मनापासून स्वागत करायला हवं. माझ्यावर यशवंतराव चव्हाणाचे संस्कार झाले आहेत. त्यांचे सर्वांशी वैयक्तिक संबंध चांगले होते. राजकीय मतभेद एका ठिकाणी आणि वैयक्तिक नाती एका ठिकाणी यात काही गैर नाही, असं त्या म्हणाल्या.
ठाकरे-फडणवीस भेटीने पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे, याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर महाविकास आघाडी पाच वर्षे नाही पण 25 वर्षे या राज्याची सेव करेल, असं त्या म्हणाल्या.
नागपूर मेट्रोत आरक्षण डावलून भरती होत आहे. त्याच्या चौकशीचीही मागणी होत आहे. याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. चौकशीची मागणी होत असेल आणि त्यात खरे पणा असेल तर कुणाचीही चौकशी करावी. आमचं काही दडपशाहीचं सरकार नाहीये. मागणी असेल तर माहितीचा अधिकार हा मनमोहन सरकारने दिला आहे. पारदर्शक कारभारासाठीच त्यांनी हा अधिकार दिला आहे. आताच्या केंद्र सरकारने माहितीचा अधिकारावर बऱ्याच यंत्रणा आणल्यात. आमचे सरकार केंद्रात आणि राज्यात असताना पारदर्शकपणा काय असतो हे आम्ही दाखवून दिलं आहे. त्यामुळे मेट्रोच्या पदभरतीची कोणी चौकशीची मागणी करत असेल तर त्याचा तो अधिकार आहे, असं त्या म्हणाल्या.