तुम्हाला वाटत असेल की तिसरी लाट ओसरली तर तुम्ही चूकत आहात. कारण चौथी लाट महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळेच राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.
आशिया आणि युरोप खंडात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धुमाकूळ घातलाय. बहुतांश देशांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारनेही हालचाली सुरू केल्या आहेत.
केंद्रानं कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारही अॕक्शन मोडवर आलंय. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार तापसदृश्य लक्षणं आणि तीव्र श्वसन विकारांच्या आजारांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आलंय. याशिवाय पॉझिटीव्ह रूग्णांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी तातडीनं पाठवण्यात यावेत असंही या आदेशात म्हंटलंय.
कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनंही तातडीनं पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. बाहेरगावाहून येणा-या नागरिकांची पालिकेकडून माहिती घेतली जातेय.
कोरोना रूग्णांवर लवकरात लवकर उपचार करण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलंय. शासकीय स्तरावरील हालचाली पाहता चौथी लाट येणार हे स्पष्ट होतंय. त्यामुळे आता नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे.