रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर आता जगावर अणु युद्धाचा धोका निर्माण झालाय. नाटो च्या एका माजी प्रमुखांच्या मते रशिया आणि यूक्रेनमधील संघर्षामुळे अणु युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. युरोपचे माजी NATO डेप्युटी सुप्रीम अलाईड कमांडर जनरल सर एड्रियन ब्रॅडशॉ यांनी सांगितलं की, रशियाच्या सैन्याने नाटो भागात पाय टाकला तर नाटोचे सदस्य रशियाविरोधात युद्ध पुकारतील. यूक्रेनच्या पूर्वेला नाटोचे सदस्य देश आहेत. अशावेळी या देशांवर रशियाकडून चुकूनही हल्ला झाला तरी भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते!
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यूक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर आज जनरल सर एड्रियन यांनी गुड मॉर्निंग ब्रिटनवर बोलताना इशारा दिलाय. रशियाच्या सैन्याने जर नाटो सदस्य देशांमध्ये प्रवेश केला तर त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
यूक्रेनजवळ एस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुआनिया, पोलंड, झेक प्रजासत्ताक, स्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया आणि बल्गेरिया असे नाटो सदस्य देश आहेत. दरम्यान, ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामुळे अणु युद्धाची शक्यता निर्माण होऊ शकते. आपल्याला हे होऊ देऊन चालणार नाही. अण्वस्त्र कुठल्याही परिस्थितीत धोकादायक ठरू शकतात, असं जनरल ब्रॅडशॉ यांनी म्हटलंय.
दरम्यान, सर जनरल ब्रॅडशॉ म्हणाले की, यूक्रेनवरील हल्ल्या संदर्भात अण्वस्त्रांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे असं मला वाटत नाही. रशियाची नाटो देशांशी टक्कर होऊन परिस्थिती गंभीर बनली असती किंवा नियंत्रणाबाहेर गेली तर अणु युद्धाचा धोका निर्माण होईल. ब्रॅडशॉ म्हणाले की परिस्थिती टोकाला घेऊन जाणे हे रशियाचे तत्व आहे.
रशिया परिस्थिती इतकी टोकाला नेतो की त्याची कल्पनाही आपण करु शकत नाही. अशा परिस्थितीत मोठा धोका निर्माण होतो. त्या दिवसासाठी आपण तयार असलं पाहिजे. मात्र, तसं होऊ देऊ नये, असंही ब्रॅडशॉ यांनी म्हटलंय.