पार्लमेंटमध्ये ‘असंसदीय’ शब्दांचा वापर करण्यास निर्बंध येणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला मात्र, असे शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले जातील, असं स्पष्ट करण्यात आलं. सोबतच संसद भवन परिसरात निदर्शने, धरणे, उपोषण, आंदोलन करण्याला केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यावरुनच आता शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.यावेळी हरिशंकर परसाई यांच्या काही ओळींचाही उल्लेख करण्यात आला आहे. यात शिवसेनेनं म्हटलं, “हुकूमशहा हा एक डरपोक माणूस असतो. चार गाढवे एकत्र चरत असली तरी त्याला भीती वाटते की, आपल्याविरुद्ध कटकारस्थान चालले आहे’’ आजचं चित्र यापेक्षा वेगळं दिसत नाही!
सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं काय म्हटलं –
भारतीय संसद अधिक सभ्य आणि सुसंस्कृत करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसलेली दिसते. सरकारने ‘असंसदीय’ शब्दांची नवी यादी जाहीर केली आहे. जयचंद, शकुनी, जुमलाजीवी, दलाल, सांड, भ्रष्ट, असत्य, अपमान, तानाशाह, विनाश पुरुष, कालाबाजारी असे मजबूत शब्दभांडार संसदेत उधळण्यावर त्यामुळे निर्बंध येणार आहेत. सत्ताधारी बाकांवरील सदस्य हे गेल्या काही वर्षांपासून शिस्तीचे अजीर्ण झाल्याप्रमाणेच वागत आहेत. पण विरोधी बाकांवरील सदस्यांनीही या अमोघ शब्दशस्त्रांचा वापर करू नये यासाठी हा सगळा डाव रचण्यात आला आहे.
या नवीन ‘असंसदीय’ शब्दांच्या यादीवरून वादंग निर्माण झाल्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यावर खुलासा केला आहे. संसद सचिवालयाकडून कोणत्याही शब्दांवर बंदी आणलेली नसून प्रत्येक संसद सदस्य आपले मत मांडण्यासाठी मुक्त आहे. मात्र लोकसभा सचिवालयाने सूचिबद्ध केलेले ‘असंसदीय’ शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले जातील, असे लोकसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे शब्द वापरावर बंदी नसली तरी ते कामकाजातून काढून टाकले जाऊ शकतील. थोडक्यात, संसद सदस्यांचा बोलण्याचा अधिकार मान्य करायचा, पण त्याच वेळी त्याने कोणते शब्द वापरायचे नाहीत, याचाही अप्रत्यक्ष आदेश द्यायचा, असा हा प्रकार म्हणावा लागेल.
जो पक्ष ‘‘आम्ही आणीबाणी व हुकूमशाहीविरुद्ध लढा दिला’’ असे उठताबसता बोलत असतो त्यांनीच लोकशाही, स्वातंत्र्य व संसदीय कार्यावर असा घाव घालावा? भाजप प्रतिवर्षी आणीबाणीचे श्राद्ध घालण्याचा राजकीय सोहळा साजरा करतो. त्या सोहळय़ाच्या बरोबरीने आता संसदेच्या सध्याच्या अवस्थेचेही तेरावे घालून मोकळे व्हा, अशी चीड जनतेतून प्रकट होताना दिसत आहे.
‘नव्या भारताचा नवा शब्दकोश’ असे वर्णन राहुल गांधी यांनी केले आहे ते योग्यच आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार डेरेक ओब्रायन यांनी तर परखडपणे सांगितले, ‘‘माझ्यावर कारवाई करा. मला निलंबित करा. मी हे शब्द वापरत राहीन. मी लोकशाहीसाठी लढणार आहे!’’ देशाच्या राजकारणात, समाजात आजही जयचंद आणि शकुनी आहेत. त्यास जबाबदार आपली समाज व्यवस्थाच आहे. भाजपास जयचंद, शकुनी अशा ऐतिहासिक शब्दांचे भाले का टोचावेत? पावलापावलावर शकुनीचे कपट-कारस्थान दिसत असताना देशहितासाठी अशा शकुनींवर हल्ला न करणे ही देशाशी प्रतारणाच ठरेल, असंही यात म्हटलं आहे.