आज संवेदना कमी होत आहे ती जपत आपल्या हातांना देण्याची सवय लवकरात लवकर लावा असे आवाहन रोटरीचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा (पुणे) यांनी केले.
गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या पदग्रहण सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी सहप्रांतपाल डॉ. मुर्तुझा अमरेलीवाला यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना पालेशा यांनी 55 ते 60 टक्के लोकांना आजही मुलभूत सोयी-सुविधा मिळत नाही. दुसरीकडे आपण मर्यादीत गरजा असतांनाही अवास्तव अपेक्षा ठेवतो. त्या ऐवजी आपण इतरांना सुखी करा तुम्हाला सुख लाभेल असा साधु वासवानी यांचा संदेश त्यांनी सांगितला. कवी हरिवंशराय बच्चन यांची ‘मकान चाहे कच्चे थे, लेकीन रिश्ते पक्के थे’ ही कविता सांगत नातेसंबंध, आपुलकी यावर प्रकाशझोत टाकला. आपण समाजाचे देणं लागतो त्यासाठीच प्रत्येक सदस्य रोटरीत येतो असे त्यांनी सांगितले. शेवटी मैत्री विषयी चार भाषेत भावना व्यक्त केल्या.
मावळते अध्यक्ष राजेश चौधरी व मानद सचिव विलास देशमुख यांनी केलेल्या कार्याचे सादरीकरण केले. नूतन अध्यक्ष विपुल पारेख व मानद सचिव रविंद्र वाणी यांनी पदभार स्विकारला. विपूल पारेख यांनी मनोगत व्यक्त करुन कार्यकारिणीची घोषणा केली. सहप्रांतपाल डॉ. अमरेलीवाला यांनी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांच्या संदेशाचे वाचन केले. परिचय डॉ. नरेंद्र जैन यांनी तर सूत्रसंचालन डॉ. अंजुम अमरेलीवाला यांनी केले. यावेळी रोटरी सेंट्रलने 2021-22 मध्ये केलेल्या कार्याच्या “वार्षिक” अंकाचे प्रकाशन करण्यात आले. नूतन अध्यक्ष व सचिवांच्या कुंटुंबियाचा सत्कार करण्यात आला. प्रेसिडेंट इलेक्ट संदीप मुथा यांनी आभार मानले.