‘मी अनेक छोटे-मोठे ऑपरेशन केले, एकही आमदार पडणार नाही, नाहीतर राजकारण सोडेन’, मुख्यमंत्र्यांचं धडाकेबाज भाषण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार आज त्यांच्या गटाच्या सर्व आमदारांकडून करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धडाकेबाज भाषण केलं. नवं सरकार स्थापन होण्याआधी मुख्यमंत्र्यांची काय घालमेल झाली याबाबत त्यांनी मोकळेपणाने भाष्य केलं. तसेच आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळा निर्णय घेतला असला तरी आपल्या गटातील एकाही आमदाराला आगामी निवडणुकीत पडू देणार नाही, असं शिंदे ठामपणाने म्हणाले.”मी जिकडे ऑपरेशनला माणसं पाठवतो ते ऑपरेशन कधी फेल होत नाही. मला छोटे-मोठे ऑपरेशन करायची सवय होती. पण हे मोठं ऑपरेशन होतं. मोठं ऑपरेशन होतं. मलाही टेन्शन होतं. कसं होणार, काय होणार. मला हे सांगायचे सगळं ठिक होईल. या 50 लोकांना टेन्शन नव्हतं. ते बिंधास होते. ते म्हणाले, तुमच्यावर आम्ही विश्वास टाकलेला आहे. जे काही व्हायचं ते होवू दे. पण तुम्ही बिंधास राहा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सुरुवातीचे तीन दिवस, तीन रात्र हा एकनाथ शिंदे एक मिनिटही झोपला नव्हता”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मला माझं टेन्शन नव्हतं. माझ्यावर विश्वास ठेवून जे 50 लोकं आली होती त्यांच्या राजकीय करिअरचं टेन्शन आलं होतं. पण सगळं नीट झालं. बाळासाहेब, दीघे साहेब, थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद. कामाख्या देवीनेसुद्धा आम्हाला आशीर्वाद दिला. कामाख्या देवीसाठी 40 रेडे पाठवले, असं ते म्हणाले. काय ही भाषा? पण आम्ही पातळी सोडली नाही. पण कामख्या मातेने कुणाचा बळी घेतला? कारण कामख्या मातेला माहिती आहे, यांची समाजाला गरज आहे. हे 40-50 लोक राज्याच्या हितासाठी चांगले आहेत. त्यामुळे आम्ही कामाख्या देवीचा आशीर्वाद घ्यायला जाणार आहोत”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
राज ठाकरे – फडणवीस भेटीदरम्यान उपस्थित असणाऱ्या नांदगावकरांचं युतीसंदर्भात सूचक विधान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईमधील राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सूचक विधान केलं आहे. नांदगावकर यांना राज आणि फडणवीस यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता उत्तर देताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली.“भविष्यात काय होईल, कोण कोणाचा मित्र ठरतो किंवा शत्रू ठरतो हे पवार साहेबांनी महाविकास आघाडी करुन दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर आता जे अचानक भयानक जे बदल घडलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहिलेले आहेत. त्यामुळे नक्की काय होईल हे आता मला सांगता येणार नाही,” असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
13 दिवसांच्या पावसाने 1 लाख 21 हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचा चुराडा
जून महिन्यात मान्सूनने दडी मारल्यानंतर मान्सूनचे आगमन कधी अशी चर्चा रंगली होती. दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या राज्यात जोर कायम आहे यामुळे राज्यातील कित्येक जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील कित्येक जिल्ह्यात पावसाने नद्या इशारा पातळी आणि धोका पातळ्या गाठल्या आहेत. यामुळे नदी किनाऱ्यावर असणाऱ्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागच्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 1 लाख 21 हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.
बाळासाहेबांच्या विचाराने चालताय, मग औरंगाबादच्या नामांतराला स्थगिती का? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझं सरकार आल्यावर मी औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करेल, मग आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या नामांतराला स्थगिती का दिली? असा सवाल विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. आज अकोले येथे अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शेतकरी समृद्धी मंडळाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी अजित पवार आले होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
तापाने फणफणलेल्या लेकरासाठी पित्याची पुरातून जीवघेणी पायपीट
चंद्रपूर जिल्ह्यात मागच्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे वर्धा, वैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या काठावरील पोडसा या गावाला बेटाचे स्वरूप आले आहे, अशी परिस्थिती याठिकाणी निर्माण झाली आहे. यातच गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा या गावातील श्यामराव पत्रूजी गिनघरे यांचा मुलगा कार्तिक याला ताप आला. तो तापाने फणफणत होता. त्यात गावात आरोग्य सुविधा नाहीत. अशा परिस्थितीत दुसऱ्या गावाला जाणारे मार्ग पुराने वेढलेले होते. मात्र, या मुलाची वेदना त्याचा बाप बघू शकत नव्हता. त्यामुळे त्याने थेट पुरातूनच जाण्याचा निर्णय घेतला.पोडसा या गावापासून 5 ते 6 किमी अंतरावर वेडगाव हे गाव आहे. येथे खासगी डॉक्टर आहेत. त्याठिकाणी श्यामराव पत्रूजी गिनघरे आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन भर पुरातून मार्ग काढत गेले. त्याठिकाणी त्यांनी मुलावर उपचार केला आणि मग पुरातूनच मार्ग काढत परत गावाकडे आले. या जिगरबाज बापाने थेट पुरातून मार्ग काढत आपल्या मुलाला डॉक्टरांपर्यंत पोहोचवले.
‘अमृता फडणवीस यांचे वाईट वाटते, किती नवस केले, पण….’, विनायक राऊतांचे टोमणे
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे दिल्लीत असलेल्या केंद्रीय मंत्र्यांवर नाव न घेता टीका केली. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून माईक ओढतात, उद्या पॅन्ट ओढतील, नागडे करून सोडतील. खोक्यांना बळी पडलेल्यांचे राजकीय आयुष्य नाही”, अशा शेलक्या शब्दांमध्ये विनायक राऊत यांनी टीका केली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा उल्लेख करत टीका केली.”मला अमृता फडणवीस यांचे वाईट वाटते. त्यांनी किती नवस केले. पण फडणवीस हे बहुरूपी आहेत. हे दिल्लीने सिद्ध केले. दिल्लीने फडणवीसांचा बकरा केला. तुम्हाला हाताखाली काम करावं लागतंय. फडणवीस यांच्या सारख्या निष्ठावंताची अवहेलना होते हे बघवत नाही. लाथ मारा यांना, काय असते निष्ठा हे दाखवून द्या”, असा सल्ला राऊतांनी दिला.
मुळा धरणाचा उजवा कालवा फुटला! हजारो लिटर पिण्याचं पाणी वाया
मागच्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. झालेल्या पावसाने शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात 46.2 मिमी पाऊस झाला. आतापर्यंत 159.8 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे मुळा धरण 35.23 टक्के तर भंडारदरा धरण 42 टक्के भरले आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने धरण क्षेत्रात पाण्याचा दाब वाढल्याने मुळा धरणाचा उजवा कालवा फुटला आहे. यामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात ही घटना घडली आहे. देवगाव येथे सकाळच्या दरम्यान अचानक कालवा फुटल्याने पिण्याचे पाणी वाया जात आहे. पुढच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले पाणी वाया गेल्याने कालव्याच्या अखत्यारित असणाऱ्या गावांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
JEE Main 2022 : 100 टक्के मिळवूनही टॉपर नव्य हिसारिया पुन्हा देणार परीक्षा!
अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा असलेल्या ‘जेईई मेन’मध्ये यावर्षी पैकीच्यापैकी मार्क मिळवलेला विद्यार्थी पुन्हा एकदा ती परीक्षा देणार आहे. राजस्थानच्या हनुमानगढमधील नव्य हिसारिया याला जेईई मेन 2022च्या पहिल्या राऊंडमध्ये फक्त 100 पर्सेंटाईलच नव्हे, तर 300 पैकी 300 मार्कही मिळाले होते. आता या वर्षी होणाऱ्या दुसऱ्या सेशनमध्ये तो पुन्हा परीक्षेला बसणार आहे. यामुळे आपला आणखी सराव होईल, तसंच टाईम-मॅनेजमेंट स्किल वाढवण्यासाठी याचा फायदा होईल, असं नव्यचं म्हणणं आहे.
पत्नीनं मंगळसूत्र काढलं म्हणून पतीला मिळाला घटस्फोट, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
पतीपासून वेगळं राहत असलेल्या पत्नीनं मंगळसूत्र काढून टाकणं ,ही गोष्ट पतीचा मानसिक छळ करणारी असू शकते, असे मत मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. न्यायालयानं या आधारावर पीडित पतीचा घटस्फोट मंजूर केला आहे. ‘गळ्यातलं मंगळसूत्र काढणं हे विवाह संपुष्टात आणण्यासाठी पुरेसं आहे असं आम्ही म्हणत नाही. मात्र, पत्नीने केलेलं कृत्य हा एक मोठा पुरावा आहे. विभक्त होताना मंगळसूत्र काढण्याचं पत्नीचं कृत्य, आणि रेकॉर्डवर उपलब्ध असणारे इतर पुरावे यातून दोघांनाही हा विवाह पुढे सुरू ठेवायचा नाही हे सिद्ध होतं,” असं स्पष्ट करत न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला.जस्टिस व्ही. एम. वेलुमणी आणि एस. सौंथर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
केरळ इंटरनेट सेवेसाठी देशातील पहिलं ‘आत्मनिर्भर’ राज्य, 20 लाख नागरिकांना मिळणार फ्री Wi-Fi
देशातील अगदी कानाकोपऱ्यांत, गावखेड्यांत आता इंटरनेट पोहोचलं आहे. अगदी शहरांतील रेल्वे स्टेशन ते गावांतील एसटी स्टँडपर्यंत अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा मोफत देण्यात येत आहे. पण देशातील एक राज्य मात्र असं आहे ज्या राज्य सरकारनं स्वत:ची इंटरनेट सेवा सुरू केली आहे. हे राज्य आहे केरळ. केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेडला दूरसंचार विभागाकडून इंटरनेट सेवा प्रदान करण्याचं लायसन्स मिळालं आहे. याबद्दलचं वृत्त झी न्युज च्या वेबसाईटवर देण्यात आले आहे.
SD Social Media
9850 60 3590