सिंगापूर ओपन सुपर 500 बॅडमिंटन टुर्नामेंट सध्या सुरु आहे. ही टूर्नामेंट 12 जुलैपासून सुरु झाली आहे. येत्या 17 जुलैपर्यंत ही टूर्नामेंट असणार आहे. भारताची नामवंत बॅडमिंटनपटू साईना नेहवालने सिंगापूर ओपन सुपर 500 बॅडमिंटन टुर्नामेंटची सुरुवात यशाने केली आहे. स्पर्धेच्या ओपनिंग राउंडमध्ये मालविका बनसोडला तिने 21-18, 21-14 अशा सेट्समध्ये हरवलं. 34 मिनिटं ही मॅच सुरू होती. साईनाला याआधी सलग तीन मॅचेसमध्ये हार पत्करावी लागली होती. ती अपयशाची मालिका या यशाच्या साह्याने तिने खंडित केली आहे. ‘अमर उजाला’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
या मॅचमध्ये साईनाची प्रतिस्पर्धी होती 20 वर्षांची मालविका बनसोड. मालविका साईनालाच आपला आदर्श मानते. तिच्याविरुद्ध खेळताना मालविकाने सकारात्मक खेळाचं दर्शन घडवलं. तिने पहिल्या गेममध्ये ब्रेकपर्यंत 11-9 अशी आघाडी कायम राखली होती. त्यानंतर तिने 18-16 अशी आघाडी घेतली; मात्र त्यानंतर साईनाने आघाडी घेतली आणि 21-18 अशा प्रकारे पहिल्या गेममध्ये 17 मिनिटांत विजय प्राप्त केला.