औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी नवे समीकरण, शिंदे गट-भाजपा यांच्यात युती
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. या अभूतपूर्व बंडखोरीनंतर अनेक नेत्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून राज्यभर शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठीही नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपा-शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार आहेत. तशी माहिती शिंदे गटातील स्थानिक नेते तथा औरंगाबाद महापालिकेचे माजी महापौर राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थकही स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत.
चीनच्या वुहानमधूनच करोनाची उत्पत्ती?
मागील जवळपास अडीच वर्षांपासून जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं आहे. दरम्यानच्या काळात जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. करोना विषाणूचा उगम नेमका कुठे झाला? याबाबत लोकांमध्ये अद्याप संभ्रम कायम आहे. पण आता करोना विषाणूच्या स्रोताबाबतचा मोठा खुलासा संशोधनातून समोर आला आहे. चीनमधील वुहान बाजारपेठेत थेट विक्री केलेल्या जिवंत प्राण्यांमध्ये दोन प्रकारचे करोना विषाणू आढळल्याचा दावा, संबंधित संशोधनात करण्यात आला आहे.
बंडखोर खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. अनेक खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारीदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यादेखील अलीकडेच शिंदे गटात सामील झाल्या आहेत. यानंतर आता काही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश करायला सुरुवात केली आहे. यानंतर आता खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनीदेखील आपल्या हातावर शिवबंधन बांधलं आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रशांत सुर्वे हे व्यवसायाने वैमानिक असून त्यांनी अनेक वर्षे एअर इंडिया आणि इंडियो विमान कंपनीत वैमानिक म्हणून काम केलं आहे. २०१४ साली त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती.
पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय; यापुढे सर्व प्रशासकीय कारभार मराठीतच
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या निवृत्तीनंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची वर्णी लागली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी सर्व कामकाज मराठीतच करणार असल्याचं सांगितलं आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंदर्भातील कडक निर्देश देण्यात आले.दिलेल्या निर्देशमध्ये आयुक्तांना पाठवला जाणारा कोणताही रिपोर्ट हा मराठीत असावा.नॉन मराठी अधिकाऱ्यांनी मराठीत संवाद साधावा.मराठी भाषा व्यवस्थित शिकून घ्यावी.सर्व अहवाल मराठीत पाठवावे.इतर भाषेतील अहवाल, स्वीकारला जाणार नाही.
‘…तर मी एकनाथ शिंदेंचं टेबलवर उभं राहून स्वागत करेन’, रामदास आठवलेंचं मिश्किल विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांचं एकत्रित स्थापन झालेल्या या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. शिंदे यांच्या गटाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. शिंदे यांच्या गटापुढे कोणत्यातरी पक्षात विलीन होणं हा एक पर्याय आहे. त्यामुळे शिंदे गट भाजपात विलीन होणार की आणखी कोणत्या पक्षात जाणार? अशा विविध चर्चांना उधाण आलं आहे. या दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला आपल्या पक्षात विलीन होण्याची खुली ऑफर दिली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचा गट आपल्या पक्षात आला तर मी टेबलवर उभं राहून त्यांचं स्वागत करेन, अशी मिश्किल प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.
‘चूक असेल तर मला फासावर द्या, पण सोनिया मॅडमना मध्ये घेऊ नका’, ‘राष्ट्रपत्नी’ कमेंटवरून संसदेत काँग्रेस-भाजप खडाजंगी
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यांनतर संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ बघायला मिळत आहे. त्यातूनच राष्ट्रपतींचा ‘राष्ट्रपत्नी’ असा उल्लेख केल्यामुळे चौधरींनी राजीनामा द्यावा आणि माफी मागावी अशी मागणी होत आहे. तर यात सगळ्या प्रकरणामध्ये सोनिया गांधींनाही भाजपनं घेरलं आहे.
चौधरी यांच्या वक्तव्याचा भाजपने तीव्र निषेध केल्याने गदारोळात लोकसभेचे कामकाजही दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक होताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चौधरी यांच्यावर बुधवारी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ संबोधून त्यांचा अनादर केल्याचा आरोप केला. चौधरी यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण आदिवासी समाज, महिला, गरीब आणि दलितांचा अनादर केल्याचा दावा इराणी यांनी केला.
देशात बेरोजगारीचं भीषण वास्तव; 1000 मधून फक्त 3 जणांना मिळते सरकारी नोकरी
शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेक तरुण-तरुणी प्रयत्नशील असतात. सरकारी अधिकारी पदावर संधी मिळावी, यासाठी तरुण यूपीएससी, एमपीएससीसारख्या कठीण परीक्षादेखील देतात. गेल्या आठ वर्षांत सातत्याने सरकारी नोकरीच्या संधी कमी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. खुद्द केंद्र सरकारने या विषयीची माहिती बुधवारी (27 जुलै 2022) लोकसभेत दिली आहे. आठ वर्षांत विविध शासकीय पदांसाठी प्राप्त अर्जांमध्ये एक टक्क्यांपेक्षाही कमी उमेदवारांची निवड झाल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. या विषयीचं वृत्त `जनसत्ता`ने दिलं आहे.
शिवसेनेला मोठा धक्का, संसदेतील कार्यालयावर शिंदे गटाचा कब्जा!
शिवसेनेमध्ये बंडखोरीमुळे मोठी वाताहत झाली आहे. आमदार, खासदारांपाठोपाठ स्थानिक नेत्यांनी शिंदे गटाची वाट निवडली आहे. अशातच शिंदे गटाने आता संसदेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.एकनाथ शिंदे यांनी आमदारांपाठोपाठ खासदारांचाही वेगळा गट स्थापन केला आहे. 12 खासदार हे शिंदे गटात सामील झाले आहे. लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या गटाला मान्यता दिली आहे. त्यानंतर आता शिंदे गटाने संसदेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतले आहे. शिंदे गटातील खासदारांनी कार्यालयावर ताबा मिळवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
IPL मधल्या टीमचे मालक जगभरात टीम विकत घेतायत हे धोकादायक; अॅडम गिलख्रिस्टचा इशारा
ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक आणि फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मालकांच्या वाढत्या मक्तेदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आयपीएल टीमचे मालक जगभरात टीम विकत घेतायत, हे धोकादायक असल्याचे त्यानं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर यंदाच्या हंगामात बिग बॅश लीग (BBL)खेळण्याऐवजी अधिक फायदा मिळवून देणारी UAE T20 लीगमध्ये खेळू शकतो, अशा वृत्तांच्या पार्श्वभूमीवर गिलख्रिस्टनं ही टिप्पणी केली आहे.
SD Social Media
9850 60 3590