धवन अँड कंपनीने विंडीजला दिला ‘व्हाईट वॉश’; डकवर्थ-लुईस नियमाने केला यजमानांचा घात

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सुरू असलेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-० अशी जिंकली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी (२७ जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे ११९ धावांनी पराभव केला. तिसरा सामना जिंकून भारताने यजमानांना ‘व्हाईट वॉश’ दिला आहे. वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीत व्हाईट वॉश देण्याची कामगिरी करणारा शिखर धवन पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.

पावसाच्या सततच्या अडथळ्यामध्ये भारताने ३६ षटकांत तीन गडी गमावून २२५ धावा केल्या होत्या. डकवर्थ-लुई नियमानुसार यजमानांना ३५ षटकांमध्ये २५७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, २६ षटकांमध्येच विंडीजचा सर्व संघ गारद झाला. त्यांना १३७ धावांपर्यंत मजल मारता आली.

विजयासाठी मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडीजची सुरुवात वाईट झाली. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकामध्ये विंडीजला सलग दोन धक्के दिले. त्यानंतर ब्रँडन किंग (४२) आणि निकोलस पूरन (४२) वगळता एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांनी खेळपट्टीवर टीकू दिले नाही. भारताच्यावतीने युझवेंद्र चहलने चार, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येक एक बळी घेतला.

त्यापूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिल या जोडीने पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी मिळून ११३ धावा जोडल्या. ५८ या वैयक्तिक धावसंख्येवर वॉल्शने धवनला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. यानंतर पावसामुळे जवळपास दोन तासांचा खेळ वाया गेला.

पाऊस थांबल्यानंतर भारताने श्रेयस अय्यर (४४) आणि सूर्यकुमार यादव (८) यांच्या रूपात आणखी दोन गडी गमावले. त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. पावसामुळे भारताचा डाव ३६ षटकांमध्येच संपवण्यात आला. भारताने ३६ षटकांत तीन गडी गमावून २२५ धावा केल्या. भारताचा शुबमन गिल ९८ धावांवर नाबाद राहिला. त्याने ९८ चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ९८ धावा केल्या. पावसामुळे त्याचे शतक हुकले. नाहीतर तो परदेशामध्ये एकदिवसीय सामन्यात शतक करणारा सर्वात तरूण भारतीय सलामीवीर ठरला असता. मालिकेत दोन अर्धशतकी खेळी करणाऱ्या शुबमनला मालिकावीराचा आणि सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

भारताला येत्या शुक्रवारपासून (२९ जुलै) वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी २० मालिका खेळायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.