ICC स्पर्धेत पुन्हा टीम इंडियाची निराशा,ऑस्ट्रेलिया बनली वर्ल्ड चॅम्पियन्स
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने फायनल सामन्यात भारताला 209 धावांनी पराभूत करून पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोरल आहे. तर भारताचे पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धा जिंकण्याच स्वप्न भंगल आहे.लंडन येथील ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यावर सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले. सामन्याच्या पहिल्या दिवशी 7 जूनला भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मैदानावर धुवाधार फलंदाजी करून तब्बल 469 धावांचा स्कोर उभा केला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शतक ठोकले. तर टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने 4 विकेट्स घेतल्या.
‘…तर सत्तेला ठोकर मारायलाही आम्ही तयार’, फडणवीस स्पष्टच बोलले
नागपूर जिल्ह्यातील पार शिवणीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती टीका केली आहे. 2019 मध्ये भाजप-शिवसेना युतीला 165 जागा देऊन निवडून दिलं, पण ठाकरेंनी खूर्चीच्या लालसेपोटी भाजपची साथ सोडली, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यात जुलमी सरकार राज्य करत असल्याचं म्हणत त्यांनी महाविकासआघाडीवर निशाणा साधला. सकाळी 9 वाजता भोंगा सुरू होतो तो थेट रात्री 10 वाजता बंद होतो, असा टोलाही फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.’अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे फक्त दोन वेळा मंत्रालयात गेले. हे मी म्हणत नाही. शरद पवारांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं, यामुळे आमच्या सरकारच्या प्रतिमेवर विपरित परिणाम झाला हे त्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवलं. आपल्यासोबत युतीमध्ये निवडून आलो, पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांची खूर्ची पसंत आली आणि खूर्चीच्या लालसेने त्यांनी आपली साथ सोडली. त्या खूर्चीकरता त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ पकडली,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे यांच्या निवडीमुळे नाराज? अजितदादांनी स्वतःच दिलं उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार स्वतः उपस्थित होते. मात्र, त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांत रंगू लागल्या आहेत. यावर स्वतः अजित पवार यांनीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. यापूर्वीही कोणतंही पद नसताना मी आमदार निवडीचं काम करत होतो आता कोणी मला थांबवणार आहे का? असंही ते म्हणाले. अजित पवार साताऱ्या दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
सोलापुरात भाजप-शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शिंदे गटाचा इशारा
भाजप-शिंदे गटाच्या युतीमधील धुसफूस हळुहळू समोर येताना पाहायला मिळत आहे. ठाण्यानंतर सोलापूर जिल्ह्यातही युतीत ठिणगी पडल्याचे दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेतील धुसपूस समोर आली आहे. पालकमंत्री विखे पाटील वेळ देत नसल्याचा आरोप शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनाला फक्त भाजपच्याच लोकांची काम करा, असा लिखित आदेश दिल्याचा आरोप संजय कोकाटे यांनी केलेला आहे. जिल्हास्तरीय समितीच्या नेमणुका अद्याप झालेल्या नाहीत जर एकनाथ शिंदे बरोबर आले नाहीत तर भाजपची काय अवस्था होईल याचा त्यांनी विचार करावा, असा इशारा भाजप नेतृत्वाला दिलेला आहे.
प्रतिक्षा संपली अखेर राज्यात मान्सूनचं आगमन!
मान्सूनबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अखेर मान्सून राज्यात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग आज मान्सूनं व्यापाला आहे. संपूर्ण गोव्यात तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशचा काही भाग मान्सूनं व्यापला आहे. याबाबत हवामान तज्ज्ञ के. एस होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.पुढील दोन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र त्याआधीच आज मान्सून राज्यात दाखल झाला आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग आज मान्सूनं व्यापाला आहे. महाराष्ट्रात प्रमाणेच संपूर्ण गोव्यात तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या काही भागात देखील मान्सूनचं आगमन झालं आहे. मात्र संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी मान्सूनला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.
कार्यकारी अध्यक्षपद मिळताच सुप्रिया सुळे अॅक्टिव मोडमध्ये; पुण्यातून कामाला सुरुवात
शनिवारी राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापन दिवस झाला. पक्षाच्या वर्धापन दिनीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपावली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान कार्यकारी अध्यक्षपदी निवड होताच सुप्रिया सुळेंनी नव्या जबाबदारीसह कामाला सुरुवात केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी नव्या जबाबदारी सह कामाला सुरुवात केली. त्या आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांंनी पुण्यामध्ये असलेल्या गांधी स्मारकाला अभिवादन करत आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठीला सुरुवात केली आहे.
‘तारक मेहता’च्या सेटवर अभिनेत्याला मारहाण…’ मोनिका भदोरियाचा गंभीर आरोप
तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी, प्रोडक्शन हेड सोहेल रमानी गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांनी असित कुमार मोदी, सोहेल रमाणी आणि जतिन बजाज यांच्यामार्फत सेटवर झालेल्या गैरवर्तनाबद्दल खळबळजनक खुलासा केल्यापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो वादात सापडला आहे.मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री सातत्याने मालिकेच्या निर्मांत्यांवर आरोप करीत आहे. त्यानंतर आता मालिकेत बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदोरियाने सुद्धा निर्मात्यांवर आरोप केले आहेत. त्यामुळं वादाचं सत्र काही संपता संपेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. मालिकेच्या सेटवर एका अभिनेत्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक खुलासा मोनिका भदोरियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे.
आता होणार राडा! तब्बल 32 वर्षांनी या चित्रपटात एकत्र झळकणार थलायवा अन् बिग बींची जोडी
रजनीकांत गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ‘थलैवर 170’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाबाबत अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स येत राहतात. आता एका चित्रपटाशी संबंधित अशा बातम्या समोर येत आहेत, ज्या ऐकून बॉलिवूडचे चाहते खूश होतील. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, भारतीय सिनेसृष्टीतील दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि रजनीकांत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. दोघांनी मिळून ‘हम’, ‘अंधा कानून’, ‘गिरफ्तार’ सारखे चित्रपट केले आहेत. आता दोघेही जवळपास 32 वर्षांनंतर ‘थलैवर 170’ मध्ये दिसणार आहेत.रजनीकांतने नुकतेच त्यांच्या ‘जेलर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून ते आता ‘लाल सलाम’वर काम करत आहेत. यानंतर रजनीकांत ‘जय भीम’ फेम दिग्दर्शक टीजे गुणनवेल यांच्या ‘थलैवर 170’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील हा 170 वा चित्रपट असेल, त्यामुळे त्याचे नाव ‘थलैवर 170’ असे ठेवण्यात आले आहे.
स्वातंत्र्यापासून सोन्याने दिलंय 68 हजार टक्के रिटर्न!
सोनं हे भारतात आजही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. यासोबतच जास्तीत जास्त सोनं खरेदी करण्याची क्रेझ भारतीयांमध्ये आहे. दरम्यान आता सोन्याचे भाव 60 हजारांच्या आसपास पोहोचले आहेत. याच कारणामुळे कोणाला सोनं खरेदीही करायचं नसेल तरीही त्याची किंमत काय हे जाणून घेण्यात सर्वांना रस असतो. आज सोन्याच्या किंमती या 60 हजारांपर्यंत पोहोचल्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या काळात सोन्याच्या किमती कित्येक पटींनी वाढल्या आहेत. गेल्या 76 वर्षात सोन्याची किंमत कधी आणि कितीने वाढल्या जाणून घेऊया.देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी म्हणजेच 1947 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 88 रुपये होती. 11 वर्षांनंतर म्हणजेच 1959 मध्ये पहिल्यांदा सोन्याच्या किमतीने 100 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार केला. त्याच वेळी, 1975 पर्यंत सोन्याने 500 ची पातळी ओलांडली होती. आजपासून 15 वर्षे मागे वळून पाहिले तर 2007 साली सोन्याचा भाव 10,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. ऑगस्ट 2020 मध्ये, त्याने 56,191 चा रेकॉर्ड पार केला. सध्या सोन्याची किंमत सुमारे 60 हजार आहे. बाजारातील लेटेस्ट आकडेवारीनुसार सोन्याचा भाव 59,980 रुपये आहे.
“…तर पंतप्रधान मोदी हे ‘नरेंद्र पुतिन’ बनतील”, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल!
आम आदमी पार्टीचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पार्टीने २०२४ ची निवडणूक जिंकली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘नरेंद्र पुतिन’ बनतील, अशी बोचरी टीका भगवंत मान यांनी केली. ते दिल्लीत आम आदमी पार्टीच्या ‘महारॅली’त बोलत होते.खरं तर, आम आदमी पार्टीने राजधानी दिल्लीत केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात महारॅली काढली आहे. दिल्ली सरकारच्या विविध सेवांवर नियंत्रण ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात ही रॅली काढली आहे. दिल्लीतील ‘रामलीला’ मैदानावर या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीतील ‘आप’ नेते आणि मंत्री गोपाल राय आणि ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी रॅलीला संबोधित केलं.
केंद्रातर्फे मणिपूरसाठी शांतता समितीची स्थापना
मणिपूरमधील विविध वांशिक गटांमध्ये शांतता प्रक्रियेचे सुलभीकरण करणे आणि परस्परविरोधी पक्षांमध्ये संवादाची सुरुवात करणे, यासाठी केंद्र सरकारने राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी सांगितले. या शांतता समितीत मुख्यमंत्री, काही मंत्री, खासदार, निरनिराळय़ा राजकीय पक्षांचे नेते आणि नागरी समाज गट यांचा समावेश असल्याचे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.राज्यातील विविध वांशिक गटांमध्ये शांतता निर्मितीची प्रक्रिया सुलभ करणे, तसेच संघर्ष करत असलेले पक्ष आणि गट यांच्यात शांततापूर्ण संवाद आणि वाटाघाटी सुरू करणे हे या समितीचे काम असेल. ही समिती सामाजिक सुसंगतता व परस्परांबाबतची समजूत बळकट करेल आणि विविध वांशिक गटांमध्ये सौहार्दपूर्ण संवाद सुलभ करेल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
विमान दुर्घटनेत ४० दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली चार छोटी भावंडे जिवंत
अमेझॉनच्या पर्जन्यवनात ४० दिवसांपूर्वी झालेल्या एका लहान विमानाच्या अपघातानंतर बेपत्ता झालेली चार छोटी भावंडे शुक्रवारी जिवंत सापडल्याची माहिती कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कोलंबियातील मूळ जमातीमधील या मुलांचा अथक शोध सुरू होता. ही मुले शोधपथकाला एकाकी अवस्थेत आढळली. त्यांच्यावर आता वैद्यकीय उपचार सुरू आहेत, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष गुस्टाव्हो पेट्रो यांनी पत्रकारांना दिली. ही मुले म्हणजे माणसाच्या जिवंत राहण्याच्या संघर्षांचे उदाहरण असून इतिहासात त्यांचा दाखला दिला जाईल, असे पेट्रो म्हणाले.
१६ एसटी कर्मचाऱ्यांची बढती रद्द होणार! पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ
एकीकडे एसटी महामंडळात बढती होत नसल्याची ओरड कर्मचारी करतात तर दुसरीकडे बढती मिळालेले १६ जण अद्यापही निश्चित ठिकाणी रूजू झाले नाहीत. हे कर्मचारी १२ जूनपूर्वी निश्चित ठिकाणी रूजू न झाल्यास त्यांची बढती रद्द होणार आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलिनिकरणाच्या मागणीसाठी काही महिन्यांपूर्वी संप केला होता. त्यावेळी बढती प्रक्रियेबाबतही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता वरिष्ठ लिपिकांची लेखाकार पदावर, तर सहाय्यक भांडारपालांची भांडारपालपदी बढती करण्यात आली. बहुतांश कर्मचाऱ्यांना विभागाबाहेर पदस्थापना दिली गेली. परंतु, या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १६ कर्मचारी अद्यापही बढतीच्या ठिकाणी रूजू झालेले नाहीत. या कर्मचाऱ्यांकडून बढती नाकारण्याबाबतही काही कळवण्यात आलेले नाही. दरम्यान, महामंडळाने १२ जून २०२३ पर्यंत बढतीच्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास त्यांचा बढतीस नकार समजून त्यांची बढती रद्द करण्याचे आदेश राज्यातील सगळ्या विभाग नियंत्रक, कार्यशाळा व्यवस्थापक आणि संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत. या विषयावर एसटीचे महाव्यवस्थापक (क. व. औ. सं.) अजित गायकवाड म्हणाले, संबंधित कर्मचारी बढतीच्या ठिकाणी रूजू न झाल्यास त्यांची नियमानुसार बढती रद्द होणार आहे.
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून रचला इतिहास
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी ४४४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण टीम इंडियाने खेळाच्या ५व्या दिवशी २३४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून या डावात नॅथन लायनने ४ तर स्कॉट बोलंडने ३ बळी घेतले. या दरम्यान विराट कोहलीने आपल्या छोट्याशा खेळीच्या जोरावर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला आहे.विराट कोहलीचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या अंतिम सामन्यात अर्धशतक केवळ एका धावेने हुकले असेल, पण तो आयसीसीच्या नॉकआउट सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. कोहलीपूर्वी, सचिन तेंडुलकर भारताकडून आयसीसीच्या नॉकआउट सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता, पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
राज्यात ४५ हून अधिक जागा भाजप-शिवसेना युतीला मिळतील- केशव प्रसाद मौर्य
राज्यात भाजप-शिवसेना लोकसभेच्या ४५ हून अधिक जागावर विजयी होईल असा विश्वास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी शनिवारी तासगाव येथे व्यक्त केला.सांगली लोकसभा मतदार संघाच्या दौर्यावर आल्यानंतर मौर्य यांचे आज तासगावमध्ये जोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत खा. संजयकाका पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, वाळवा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख निशीकांत पाटील, शिराळा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पिंपरी: संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी उद्योगनगरीत दाखल
टाळ मृदंगच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या अखंड जयघोषात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाला. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने अवघी उद्योगनगरी दुमदुमून निघाली होती.संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिराला प्रदक्षणा घातल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम देहूतीलच इनामदार वाड्यात झाला. रविवारी सकाळी शासकीय पूजा करण्यात आली. देहूकरांनी मुख्य कमानीवरून पालखीवर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर पालखी पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने मार्गस्थ झाली. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पालखी शहरात दाखल झाली. पालखी सोहळ्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी शहरातील अनेक नागरिक संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी आले होते, सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखीचा आजचा मुक्कामी आहे. सोमवारी सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.
SD Social Media
9850 60 3590