सॅटर्डे क्लबतर्फे व्याख्यानाचे आयोजन
जळगाव:- एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपाने झालेली ही पाचवी औद्योगिक क्रांती निशब्द करणारी आहे असे सुप्रसिद्ध वक्ते व सिद्धेश इन्फोटेकचे संचालक संतोष बिरारी यांनी प्रतिपादन केले.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या जळगाव चाप्टरतर्फे शाहूनगर मधील धैर्यमच्या अतिथ्यम सभागृहात आयोजित चॅट जीपीटीचा व्यवसायावर होणारा परिणाम या विषयावरील जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर चेअरमन अभिजीत पाटील व सचिव दिनेश थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानात बोलताना प्रारंभी बिरारी यांनी 1765,1870,1969,2000, आणि 2020 मध्ये झालेल्या पाच क्रांतीची माहिती देत यंत्र व तंत्र युगाचे महत्त्व समजावून सांगितले. 2022 मध्ये एआयची निर्मिती झाल्यानंतर हजारो एप्लीकेशन अस्तित्वात आले असून त्यापैकी चॅट जीपीटी हे एक आहे. परिपूर्ण व अधिकृत माहिती दहा ते वीस सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचत असून त्यासोबत बार्ड या गुगलच्या ॲप बद्दल देखील बिरारी यांनी उदाहरणासह सविस्तर माहिती देत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
पुढे बोलताना बिरारी यांनी यामुळे नोकऱ्यांवर फार परिणाम होणार नसून उलट नवीन संधी उपलब्ध होणार आहे, त्यासाठी आता केवळ एका पदवीने करिअर करणे शक्य नसून त्यासोबतच सृजनशीलता देखील गरजेची आहे असे सांगितले. व्हिडिओ डॉट एआय, बिटओव्हन डॉट एआय, या एप्लीकेशनसह इंटिरियर डिझायनर, हेअर स्टाईल, एग्रीकल्चर, होम क्लिनिंग, व्हिडिओ कॅरेक्टर रिप्लेसमेंट,जनरेटिव्ह एआय, (फोटोशॉप एआय) याविषयी माहिती दिली. रोज सकाळी नवनवीन आविष्कार या क्षेत्रात येत असून हे भविष्यातील चित्र नसून आजचे वास्तव आहे. याचे वर्णन फक्त अफाट या शब्दातच करता येईल असेही ते म्हणाले.
रिजन हेड श्रीहर्ष खाडिलकर यांनी सॅटर्डे क्लब विषयी माहिती दिली. डॉ. दीपक पाटील यांनी अनुभव कथन केले. परिचय जयेश पाटील यांनी तर आभार नैना पाटील यांनी मानले.