आज दि.२१ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा.

नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा
इंडिया गेट येथे बसवणार

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवर बोस यांचा पुतळा बसवणार असल्याची घोषणा केलीय. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा पुतळा बसवला जाणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, “संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करत असताना मला सांगायला आनंद होतो आहे की इंडिया गेट येथे त्यांचा ग्रॅनाइटचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे. हे सुभाषचंद्र बोस यांच्या योगदानाबद्दलच्या कृतज्ञतेचं प्रतिक असेल.”

भाजपा नेते गांधीवादी
कधीपासून झाले : शरद पवार

अमोल कोल्हेंवर निशाणा साधणाऱ्या भाजपा नेत्यांना उत्तर देत टोला लगावला आहे. भाजपा नेते गांधीवादी कधीपासून झाले अशी विचारणाच शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. महात्मा गांधींवरील सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावं लागेल,” असं शरद पवार म्हणाले.

सलमानचा डी गँगच्यासोबत संबंध
असल्याचा केतन कक्करचा आरोप

सलमान खान आणि त्याचा शेजारी केतन कक्कर यांच्यातील भांडण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. लाइव्ह लॉच्या वृत्तानुसार, सलमानचे वकील प्रदीप गांधी यांनी गुरुवारी कोर्टासमोर केतन कक्करची पोस्ट आणि मुलाखत वाचून दाखवली. सलमानचा डी गँगच्या लोकांसोबत संबंध असल्याचा केतनचा आरोप आहे. त्याने सलमानच्या धर्मावरही भाष्य केले. तसेच सलमान केंद्रातील पक्ष आणि राज्य पातळीवरील राजकारण्यांच्या जवळ असल्याचेही त्यांनी सांगितले. तर सलमान चाइल्ड ट्रॅफिकिंगमध्ये गुंतलेला असून त्याच्या फार्म हाऊसवर चित्रपट कलाकारांचे मृतदेह पुरले जातात, असे केतन यांनी म्हटले आहे.

अभिनेत्री जुही चावलाच्या
अडचणींमध्ये वाढ

दिल्ली राज्य विधी सेवा प्राधिकरणाने (डीएसएलएसए) बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाला ठोठावलेल्या २० लाख रुपयांच्या दंडाच्या वसुलीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ५ जी तंत्रज्ञानाविरोधात खटला दाखल केल्याबद्दल चित्रपट अभिनेत्री जुही चावला आणि इतर दोघांना ठोठावण्यात आलेला २० लाख रुपयांचा दंड जमा करण्याचे निर्देश देणाऱ्या डीएसएलएसएच्या याचिकेवर ३ फेब्रुवारीला सुनावणी होईल, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले.

इंडोनेशियाच्या विद्यार्थ्यांनी
सेल्फीतून कमावले करोडो रुपये

इंडोनेशियायी कॉलेजच्या विद्यार्थ्याने एनएफटीच्या माध्यमातून करोडो रुपये कमावले आहेत. एनएफटीअंतर्गत त्याने आपल्या सेल्फीचे डिजिटल अधिकार विकले आहेत. या विद्यार्थ्यांचे नाव सुलतान गुस्ताप अल घोजाली असे असून तो सेमारंग प्रांतात राहतो. या विद्यार्थ्याने मागील पाच वर्षांपासून प्रत्येक दिवशी आपल्या कम्प्युटर समोर बसून जवळपास १००० पेक्षा जास्त सेल्फी काढल्या आहेत. या विद्यार्थ्याने जेव्हा ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजून घेतले तेव्हा त्याने आपल्या सेल्फी एनएफटीच्या मदतीने विकायच्या ठरवल्या. जेव्हा घोजालीच्या सेल्फीची मागणी वाढली तेव्हा क्रिप्टोकरन्सी इथरच्या ($८०६) ०.२४७ मध्ये एक सेल्फी उपलब्ध होता. विद्यार्थ्याने पुढे सांगितले की, त्याने डिसेंबरमध्ये सेल्फी अपलोड केली.

पुण्यात मावळमध्ये वीस वर्षीय
तरुणाचा गोळ्या झाडून खून

पुण्यात मावळमध्ये वीस वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहन चंद्रकांत येवले (२०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून अविनाश शिवाजी भोईर (२५) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. दोघे ही नातेवाईक असून आढले खुर्द या गावात राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. यातूनच रोहनचा खून केल्याचा संशय पिंपरी-चिंचवड पोलिसांना व्यक्त केला आहे.

लता मंगेशकर यांची प्रकृती जैसे थे,
कोरोनासोबत न्यूमोनियाचाही त्रास

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर सध्या ब्रीज कँडी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नाही, असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय. तसंच त्या किती दिवसात बऱ्या होतील, हे सांगणे कठीण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यांना सध्या ऑक्सिजनवर ठेवण्यात आलंय. गेली 11 दिवस त्यांच्यावर ब्रीज कँडीमध्ये उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच त्यांना न्यूमोनियाचाही त्रास होतोय.

टी-20 वर्ल्डकप भारत-पाकिस्तान
सामना 23 ऑक्टोबरला होणार

ऑस्ट्रेलियात यंदाच्या वर्षी 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच वेळापत्रक जारी झालं आहे. यंदाचा टी-20 वर्ल्डकप (T-20 World cup) ऑस्ट्रेलियात होणार आहे. ऑस्ट्रेलियाच विद्यमान टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन आहे. वर्ल्डकप स्पर्धेत कोट्यवधी चाहत्यांना प्रतिक्षा असते, भारत-पाकिस्तान सामन्याची. वर्ल्डकप मध्येही भारत-पाकिस्तान भिडणार आहेत.

राज्यातील धरणांमध्ये 80.33 टक्के
साठा, पाणीटंचाई दूरच

सध्या राज्यातील धरणांमध्ये 80.33 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळं यंदा मे महिन्याच्या उकाड्यातंही राज्यातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागातील लघू, मध्यम आणि मोठ्या एकूण धरणांमध्ये सरासरी 82.33 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणांमध्ये नऊ टक्के जास्त पाणीसाठा आहे. ही राज्यातील जनतेसाठी आनंदाची बाब आहे.

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन
कोठडीत 14 दिवसांची वाढ

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजही दिलासा मिळू शकला नाही. 100 कोटींची वसूली आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांना आणखी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागणार आहेत. देशमुख सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. यापूर्वी मुंबईच्या विशेष न्यायालयानेही त्यांना दिलासा दिला नव्हता.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.