विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फडणवीसांच्या नाशिक दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंगवरुन कमेंट करणाऱ्या काही जणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या बिटको हॉस्पिटलमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना परिस्थिती बाबत आढावा घेतला होता. दौऱ्यात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरही (Pravin Darekar) त्यांच्यासोबत होते. त्यावेळी काही जणांनी फडणवीसांविषयी आक्षेपार्ह भाषेत हेटाळणी केली होती
फडणवीसांच्या हॉस्पिटल दौऱ्यात काही जणांनी वरच्या मजल्यावरुन एक व्हिडीओ शूट केला. “माजी मुख्यमंत्र्यांचं सोशल डिस्टन्सिंग बघा” अशा आशयाच्या कमेंट्स व्हिडीओ शूट करणारी आणि त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती करत होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
नाशिकमधील झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीत मोठी गळती झाली आणि ऑक्सिजन पुरवठ्या अभावी रुग्णालयातील 22 रुग्णांचा मृत्यू झाला. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली होती. ‘महापौर आणि भाजपचे 3 आमदार कुठे आहेत? ते फरार झाले काय?’ असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला होता.