रिझर्व्ह बँकच्या दोन योजनांचे
पंतप्रधानांनी केले उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारतीय रिझर्व्ह बँकच्या दोन योजनांचं उद्घाटन केलं. भारतीय रिझव्ह बॅकेने रिटेल डायरेक्ट स्कीम आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजनेचं मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या वेळी मोदींनी करोनाच्या कालावधीमध्ये आरबीआयच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांचं कौतुक केलं. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ग्राहकांसाठी महत्वाच्या असतील असं सांगण्यात येणाऱ्या या दोन योजनांचं उद्घाटन केलं.
एसटी महामंडळाने केले
आंदोलन मागे घेण्याचे आवाहन
आज एसटी महामंडळाने एक निवेदन प्रसिद्ध करत संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केलं आहे. एसटी महामंडळाचा संचित तोटा हा १२ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचला आहे. संपामुळे दररोज १५ ते २० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. याचा परिणाम महामंडळाला आणि परिणामी एसटी कर्मचाऱ्यांना सहन करावा लागणार असल्याचं निवेदनात सांगितलं आहे. सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याने संप मागे घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केलं आहे.
सीमेलगत रस्ते अरुंद,
क्षेपणास्त्र कसे नेणार
भारत-चीन सीमेला लागून असलेल्या पर्वतीय प्रदेशात महत्त्वपूर्ण लष्करी उपकरणे पोहोचवण्यासाठी उत्तराखंडच्या चार धाम प्रदेशात रस्ते रुंद असणे आवश्यक आहेत, असे केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. “लष्कराला या प्रदेशात ब्रह्मोस न्यायचा आहे. त्यासाठी मोठी जागा लागेल. परिणामी भूस्खलन झाल्यास लष्कर त्याचा सामना करेल. जर रस्ते पुरेसे रुंद नसतील तर आम्ही कसे जाणार?” असा अटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी केंद्रातर्फे न्यायालयात युक्तिवाद केला आहे.
फ्रान्समध्ये करोनाच्या
पाचव्या लाटेला सुरुवात
फ्रान्समध्ये करोनाच्या पाचव्या लाटेला सुरुवात झाली आहे. फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिवर वेरन यांनी TF1 टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधी गंभीर इशारा दिला आहे. पाचव्या लाटेत करोना संक्रमण वेगाने होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. करोना लवकरच पूर्णपणे नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दावे केले जात असताना आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे नागरिकांमध्ये चिंता आहे. दुसरीकडे जर्मनीतही करोना पुन्हा एकदा बळावला असून गेल्या २४ तासांत ५० हजार नवे रुग्ण आढळले आहेत.
सलमान खुर्शीद पुरुष वेषातील
कंगना रणौत : संजय राऊत
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात, सद्य:स्थितीतील हिंदुत्वाची तुलना ‘आयसिस’ व ‘बोको हराम’ या दहशवादी संघटनांच्या जिहादी विचारांशी केल्यामुळे राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरुन संताप व्यक्त केला असून हे तर पुरुष वेषातील कंगना रणौत असल्याचा टोला लगावला. पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी हा काँग्रेस, राहुल गांधींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप केला.
रामाची घोषणा देणारे सगळे मुनी
नाहीत, तर राक्षस, काँग्रेसचे नेते बरळले
काँग्रेसचे अजून एक नेते राशीद अल्वी यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेलं विधान वादात सापडलं आहे. “जय श्री रामची घोषणा देणारे सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत”, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद सुरू झाला असून भाजपाकडून यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेण्यात आला आहे. सलमान खुर्शीद आणि राशीद अल्वी यांच्या विधानांमुळे काँग्रेस पक्ष मात्र टीकेच्या केंद्रस्थानी आला आहे.
लैंगिक अत्याचार करून मुलाला
जन्म देण्यास भाग पाडले
महाराष्ट्रातील एका २१ वर्षीय महिलेला मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये घरात बंद करून ठेवल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी या महिलेला केवळ घरात बंदच केलं नाही, तर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून मुलाला जन्म देण्यास भाग पाडल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांना एकाला अटक केली आहे.
कर्नाटकमध्ये बसमधून प्रवास
करताना गाणी वाजवण्यास बंदी
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईल स्पीकरवर गाणी वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने यापूर्वी न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेच्या आधारे बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याचिकेत बसमधील आवाजाच्या त्रासावर निर्बंध आणण्याची मागणी केली होती. मोठ्या आवाजात गाणी आणि व्हिडिओ प्ले करण्यासाठी मोबाइल फोनचा वापर प्रतिबंधित करण्यात यावा, असे त्यात म्हटले आहे.
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण
१९ नोव्हेंबरला होणार
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबरला होणार आहे. यापूर्वी २६ मे रोजी पहिले चंद्रग्रहण झाले होते. धार्मिक मान्यतांनुसार चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण, दोन्ही अत्यंत अशुभ मानले जातात. कारण या काळात पृथ्वीवर नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, ज्याचा या पृथ्वीवरील सर्व सजीवांवर वाईट परिणाम होतो. त्याच वेळी, वैज्ञानिकांच्या मते, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्राला प्रकाश मिळत नाही, या खगोलीय क्रियेला चंद्रग्रहण म्हणतात.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत
अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली संघाची कमान सांभाळणार आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे.
SD social media
9850 60 3590