आरक्षणाची ५० टक्क्यांची
मर्यादा शिथील करावी
मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं आहे असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. जे विषय मांडले आहेत ते सकारात्मक पद्धतीने पंतप्रधान सोडवतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी अशी मागणी मोदींकडे केली आहे. नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणही यावेळी उपस्थित होते.
जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात,
तेव्हा चर्चा तर होणारच
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत पंतप्रधानांनी सुमारे तासभर चर्चा केली. या भेटीनंतर तर्क-वितर्कांना उधाण आल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता, “जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच”, अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. “जर चर्चा सुरू झाली असेल, तर नक्कीच ती भेट महत्त्वाची होती”, असं देखील राऊत म्हणाले आहेत.
कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात
तीन भावंडांचा बुडून दुर्दैवी अंत
बंधाऱ्यातील वाहत्या पाण्यात पडलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पट्टीचे पोहणाऱ्या तीन भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना आटपाडी तालुक्यातील घाणंद येथे घडली. पाण्यात बेपत्ता झालेल्या तीन भावंडांचे मृतदेह सोमवारी सकाळी बचाव पथकाच्या हाती लागल्यानंतर कुटुंबासह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.
परदेशी वृत्तसंस्थांच्या काही
वेबसाईट्स काही काळ बंद
परदेशी वृत्तसंस्थांच्या तसंच इतरही काही आंतरराष्ट्रीय वेबसाईट्स काही काळ बंद पडल्या आहेत. द न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रिट जर्नल या साईट्सवर गेल्यावर तिथे सारखीच एरर दाखवत आहे. या साईट्स 503 ही एरर दाखवत आहेत.
कोवॅक्सिन आणि स्पुतनिक लस
घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी
गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या दुसर्या लाटेचा विळखा हळूहळू सैल होत आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्यामुळे केंद्रासह राज्य सरकारांनी लसीकरणावर भर दिला आहे. अनेक ठिकाणी लशीचा तुटवडा भासत असला तरी लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटले आहे. परदेशात शिक्षणासाठी जायचे असल्यास लसीकरण करणे अनिवार्य असल्याने विद्यार्थी लसीकरणासाठी प्राधान्य देत आहेत. देशात कोविशील्ड, कोवॅक्सिन लशींचे डोस दिले जात आहे. आता रशियाची स्पुतनिक लसही मिळत आहे. परंतु कोवॅक्सिन आणि स्पुतनिक लस घेणार्या विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
लसीकरण मोहिमेचा वेग वाढावा
यासाठी नागरिकांना गिफ्ट्सची आमिषं
निवडणुकांच्या काळात मतांसाठी काही उमेदवार मतदारांना वेगवेगळे गिफ्ट्स देऊन खूश करताना आपण पाहिलं असेल पण चक्क लस घ्यावी म्हणून गिफ्ट्स..हे बहुधा पहिल्यांदाच घडत असावी. शहरातल्या लसीकरण मोहिमेचा वेग वाढावा यासाठी नागरिकांना अशा महागड्या गिफ्ट्सची आमिषं दाखवून लस घेण्यासाठी बोलवावं लागत आहे. चेन्नईच्या कोवलम भागातल्या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी एका सेवाभावी संस्थेने हे पाऊल उचललं आहे.
पाकिस्तानाच्या तुरुंगात १७ मनोरुग्ण
भारतीय कैद्यांचा वाली कोण
पाकिस्तानच्या तुरुंगात बंद भारतीय कैद्यांवर आजवर अनेक चित्रपट आले. कधी लव्हस्टोरी, तर कधी देशप्रेम दाखविण्यात आले. मात्र आजही एक कहाणी अधुरीच आहे. कारण पाकिस्तानाच्या तुरुंगात बंद असलेल्या १७ मनोरुग्ण कैद्यांचा भारतात कोण वाली आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. हे कैदी पूर्णपणे मनोरुग्ण नसून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत, असेही सांगितले जात आहे. कुटुंबातील कुणीतरी ओळखेल अशी आशा आहे.
डाटा सायन्सचा
अभ्यासक्रमात समावेश
केंद्रातील मोदी सरकारचे महत्त्वाकांक्षी नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात केंद्रीय स्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत. शैक्षणिक धोरण निर्धारित मुदतीत लागू करण्याचे निर्देश शिक्षण मंत्रालयाकडून संबंधित संस्थांना देण्यात आले आहेत. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तीनशे टास्क ठरविण्यात आले आहेत. त्यापैकी ८० टक्के टास्क यावर्षीच पूर्ण करायचे आहेत. यामध्ये शाळांमध्ये कोडिंग आणि डाटा सायन्सचा अभ्यासक्रमात समावेश करणे आणि विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा सुरू करण्यासारख्या महत्त्वाच्या शिफारशींचा समावेश आहे.
खासदार नवनीत राणा याचे जात
प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द
अमरावती येथील खासदार नवनीत राणा याचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द करण्यात आ आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देतांना दोन लाखांचा दंड आणि सहा आठवड्यात प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले आहे. अमरावती हा लोकसभेसाठी एससी राखीव मतदार संघ होता. या मतदारसंघातून नवनीत राणा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. माजी खासदार अडसूळ यांनी ही याचिका दाखल केली होती.
आयपीएलचा श्रीगणेशा
१९ सप्टेंबरपासून
कोरोना कधी संपुष्टात येणार यापेक्षा आयपीएलचे सामने कधी होणार, याची चिंता करणारा मोठा वर्ग भारतात आहे. कारण कोरोनामुळे घरात बसण्याची वेळ आली असताना विरंगुळ्यासाठी आयपीएल हे एक उत्तम माध्यम ठरणार आहे. अशात दोनवेळा आयपीएलवर गंडांतर आल्यानंतर आता १९ सप्टेंबरपासून श्रीगणेशा होणार असल्याचे स्पष्ट संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिले आहेत.
पुण्यात कंपनीला लागलेल्या
आगीत 18 जणांचा मृत्यू
पुण्यातल्या उरवडे जवळ कंपनीला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झालाय. यात महिलांचा समावेश अधिक आहे. दुपारच्या सुमारास एसव्हीएस या केमिकल कंपनीला भीषण आग लागली. त्यावेळी कंपनीत 40 कामगार होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येतंय. आग लागल्याचं समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
राष्ट्रीय छात्र सेना 91
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
नॅशनल कॅडेट कोर म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना याचा देशातील 91 विद्यापीठांनी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अंतर्गत जनरल इलेक्टिव्ह क्रेडिट कोर्स म्हणून अभ्यासक्रमात समावेश केला आहे. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगानं 15 एप्रिलला देशातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना पत्र लिहिलं होतं.
जनरल इलेक्टिव्ह क्रेडीट कोर्स (42) अंतर्गत एनसीसीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला.
पुढील चार दिवस मुंबईत
जोरदार पाऊस
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या भागात सकाळपासून धुवाँधार पाऊस बरसत आहे. ढगाळ वातावरण आणि बरसणाऱ्या पावसाने परिसरात काळोख दाटला आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर आता तो जोर पकडणार असल्याचं चिन्हं आहे.
आरोग्य विभागात 16 हजार
पदांची तातडीने भरती
राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. आता त्यामधील 2,226 पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण 2,226 पदे भरुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
SD social media
9850 60 3590