मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर शिंदे गट आता थेट सुप्रीम कोर्टात जाणार?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील सेनेला आज मुंबई हायकोर्टात सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दसरा मेळाव्यासाठी नेमकी कुणाला परवानगी मिळावी या मुद्द्यासंबंधित याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीत मुंबई महापालिकेचे वकील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे वकील आणि ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांच्या वकिलांनी आपापल्या पक्षकारांची भूमिका मांडली. तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने शिंदे गटाची मध्यस्थी याचिका फेटाळली. कोर्टाने सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची हमी घेण्याच्या अटीवरुन उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाने ही लढाई जिंकली. उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाईल, अशा चर्चांना उधाण आलंय. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील याबाबतची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार, अशी चर्चा सुरु झाली. याबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला प्रतिक्रिया दिली.
पुणे ; I Love… सह अनेक फलकांवर पडणार हातोडा, आयुक्तांनी दिले आदेश
शहरातील विविध चौकांमध्ये आणि पदपथांवर उभारलेल्या ‘आय लव्ह ……’ डिजिटल नामफलक आणि संकल्पनेचे नामफलक काढण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी आकाश चिन्ह व परवाना विभागाला दिले आहेत. त्यामुळे शहरामध्ये असणाऱ्या ‘आय लव्ह…’ आणि एका ठिकाणी एकापेक्षा अधिक असलेल्या संकल्पनेच्या नामफलकांवर हातोडा पडणार आहे.
महापालिकेकडून शहरात विविध विकासकामे केली जातात, विविध वास्तू आणि प्रकल्प उभारले जातात. ही कामे मुख्य खात्यांसह नगरसेवकांच्या विकास निधीतूनही केली जातात. या ठिकाणी त्या-त्या विभागाकडून नामफलक लावले जातात. त्यानंतरही नगरसेवकांकडून संकल्पनेच्या नावाखाली पुन्हा स्वतःची नावे टाकून फलक लावले आहेत. संकल्पनेच्या माध्यमातून पालिकेच्या पैशांतून स्वतःसह पक्षाची, नेत्यांची फुकटात प्रसिद्धी करून घेण्याचे नवीन फॅड आले आहे. एकाच चौकात आणि एकाच वास्तूला पूर्वीचे नामफलक सुस्थितीत असताना पुन्हा चार-चार नामफलक लावण्यात आले आहेत.
तब्बल 22.37 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. देवगड समुद्रात व्हेल माशाच्या उलटीची (अंबरनीस) तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पथकाने पवनचक्की गार्डनसमोर सापळा रचून चार संशयित पुरुष व दोन महिलांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांच्याकडे 22 किलो 370 ग्रॅम वजनाचा सुमारे व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थ, जप्त करण्यात आला. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 22 कोटी 37 लाख इतकी असल्याची स्पष्ट झाले आहे.
‘पावनखिंड’च्या कलाकारांची पुन्हा जमली भट्टी; ‘या’ सिनेमात झळकणार एकत्र
चिन्मय मांडलेकरने अनेक नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज या चारही माध्यमात काम केले आहे. त्याचप्रमाणे तो उत्तम लेखक देखील आहे. मराठीनंतर आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्याने आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. नुकताच तो ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमात दिसला होता. त्याने या चित्रपटात खलनायिकाची बिट्टा कराटे ही भूमिका उत्तम वठवली होती. त्याच्या या चित्रपटातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झालं होतं. बऱ्याच काळात चिन्मयने मराठी चित्रपटांमध्ये एकाच धाटणीची भूमिका केलीय. तो मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसलाय. पण आता तो नवीन चित्रपटात एक नवी कोरी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.
चिन्मय मांडलेकर सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. त्याने या नवीन चित्रपटाबद्दल नुकतीच एक पोस्ट केली आहे. ‘केस नंबर 99’ हे चिन्मयच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे. हा एक थरारक चित्रपट असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या चित्रपट त्याच्यासोबत मृण्मयी देशपांडे, अजय पुरकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. हा चित्रपट निखिल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला आहे.
बापाच्या कष्टाचं लेकीकडून चीज! वडील मुख्य न्यायाधीशांचे चालक तर मुलगी झाली जिल्हा न्यायाधीश
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसाठी ड्रायव्हर म्हणून काम करणारे राजेंद्र गेहलोत यांच्या कौतुकास्पद आणि मोठी कामगिरी केली आहे. कार्तिकी गेहलोत असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. राजेंद्र गेहलोत यांनी चालक म्हणून 31 वर्ष सेवा बजावत आहेत. मात्र, त्यांची मुलगी कधी न्यायाधीश होईल याची कल्पनाही केली नसेल. मात्र, आता हे खरंच घडलं आहे कारण कार्तिका गेहलोत यांनी राजस्थान न्यायिक सेवा परीक्षेत 66 वा क्रमांक पटकावला आहे असून त्यांची जिल्हा न्यायाधीश पदासाठी निवड झाली आहे.
गाड्यांची तोडफोड, भाजप कार्यालयावर हल्ले; NIA च्या छापेमारीविरोधात PFI चं हिंसक आंदोलन
केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने राज्यभरात पीएफआय संघटनांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे. एनआयएने देशभरातील 11 राज्यांमध्ये ही छापेमारी करत 100 जणांना ताब्यात घेतलं. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एनआयएने ही कारवाई केली आहे. एनआयएच्या या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (PFI) केरळमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत संप पुकारला आहे. यादरम्यान प्रचंड गदारोळ झाल्याचं वृत्त आहे. केरळपासून तमिळनाडूपर्यंत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली जात आहे. तमिळनाडूतील भाजपच्या कार्यालयावरही हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे.
‘भारत जोडो यात्रे’मुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मुस्लीम समाज आठवला – नाना पटोले
सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल (गुरुवार) ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांची दिल्लीत भेट घेऊन तासभर चर्चा केली. ज्ञानव्यापी मशिद प्रकरण, कर्नाटकमधील हिजाबचा वाद आणि भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे वादग्रस्त विधान या घटनांच्या पार्श्वभूमीवर, मुस्लिमांशी संवादप्रक्रिया कायम ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भेटीतून केल्याचे मानले जाते. तर या भेटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरएसएस व भाजपावर टीका केली आहे.
…अन् जागतिक कार्यक्रमातील भाषणानंतर स्टेजवरच गोंधळले जो बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर एका कार्यक्रमादरम्यान घटना घडली असून यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बुधवार २१ सप्टेंबरला जो बायडेन न्यूयॉर्क येथे ग्लोबल फंडच्या सातव्या परिषदेला संबोधित करत होते. आपले भाषण संपल्यानंतर ते मंचावरून खाली उतरत होते. मात्र उतरताना ते अचानक थांबले. यावेळी ते हरवल्यासारखे दिसत होते. मंचावरून खाली येताना आपल्याला पुढे काय करायचे आहे हे ते विसरले आहेत असे वाटते.
या कार्यक्रमादरम्यान बायडेन म्हणाले, ‘जे महत्त्वाचे आहे त्यासाठी लढल्याबद्दल धन्यवाद. हे सर्व जीव वाचवण्यासाठी आहे आणि त्यात कोणतंही दुमत नाही. आमच्या भागीदारांसह, आम्ही सर्व समुदाय निरोगी आणि मजबूत राहतील याची खात्री करू. जेणेकरून लोक सर्वत्र सन्मानाने जगू शकतील.’ व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की भाषण संपल्यानंतर त्यांना मंचावरून खाली यायचे होते, पण ते अचानक थांबले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने त्यांचे आभार मानले, यानंतर बायडेन मंचावरून खाली आले.
मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाशी भिडणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी२० सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आज (दि. २३) सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघावर विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आज होणार आहे आणि हा टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा सामना आहे. भारतीय संघ नागपूरमध्ये विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.
ओलसर मैदान आणि खेळपट्टीमुळे नाणेफेकीस उशीर होत आहे. दोन्ही संघाचे कर्णधार परत आतमध्ये गेले आहे. पंच मैदानावरील सर्व परिस्थिती तपासून पाहत आहे. नागपूरमध्ये गेले काही दिवस पाऊस पडत असल्याने मैदान ओले झाले आहे. आजच्या सामन्यावर देखील पावसाचे सावट आहे. दरम्यान, ओल्या मैदानामुळे नाणेफेकीस उशीर होत आहे.
SD Social Media
9850 60 3590