आज दि.१० नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

चाहत्यांचा हार्ट ब्रेक, रोहित शर्माही रडला; पण ‘हा’ खेळाडू होतोय जोरदार ट्रोल

टी20 वर्ल्ड कपच्या मैदानात आज टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर रोहित शर्मा आपल्या चेहऱ्यावरची निराशा लपवू शकला नाही. हरल्यानंतर बराच वेळ तो डग आऊटमध्ये राहुल द्रविडच्या बाजूला बसून होता. पण या मॅचनंतर टीम इंडियाचा एक खेळाडू मात्र सोशल मीडियात भरपूर ट्रोल होतोय. भारतीय संघाच्या खराब कामगिरीला या खेळाडूला जबाबदार धरलं जातंय.

टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलनं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सुमार कामगिरी बजावली. त्याला पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि आज इंग्लंडविरुद्धही दुहेरी धावांचा आकडा गाठता आला नाही. सेमी फायनलच्या निर्णायक लढतीत तो 5 धावा काढून बाद झाला. त्याआधी पहिल्या तिन्ही मॅचमध्ये त्याच्या खात्यात फक्त 22 धावा होत्या. पण तरीही तो पुढचे सगळे सामने खेळला. त्यात त्यानं झिम्बाब्वे आणि बांगलादेश या टीमविरुद्ध अर्धशतक झळकावलं. पण टॉप टीमविरुद्ध तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. म्हणूनच सध्या क्रिकेट चाहत्यांच्या तो रडारवर आहे.

अफजलखानाचे उद्दात्तीकरण करणाऱ्यांवरही बुलडोजर चालवला पाहिजे, मनसे नेत्याचं खळबळजनक विधान

साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे. चोख पोलीस बंदोबस्तात आज सकाळपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील १८०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहे. दरम्यान मनसे नेते गजानन काळे यांनी या कारवाईवर बोलताना एक खळबळजनक विधान केलं आहे. अफजलखानाचं उदात्तीकरण करणाऱ्यांवरही बुलडोझर चालवला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.“क्रूरकर्मा अफजलखान याच्या कबरीसमोरचं अतीक्रमण हटवलं याबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन आहे. अफजलखानाच्या कबरीसमोर उभारण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे, त्याप्रमाणे त्याचं उद्दात्तीकरण करणाऱ्यांवरही बुलडोजर चालवला पाहिजे. अफजलखानाच्या विचारधारेचं अतिक्रमण हटेल तोच सुदिन असेल,” असं गजानन काळे म्हणाले आहेत.

गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, नजरकैदेत ठेवण्याची मागणी मान्य

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना एक महिन्यासाठी घरात नजरकैदेत ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्यात येणाऱ्या परिसराची नीट तपासणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना न्यायालयाने दिले आहेत. येत्या ४८ तासांमध्ये या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. नजरकैदेदरम्यान घराच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या संरक्षणासाठी दोन लाख चार हजार रुपये भरण्यासही न्यायालयाने नवलखा यांना सांगितले आहे.

अपंग मंत्रालयाच्या मागणीला मुख्यमंत्र्यांची मान्यता; बच्चू कडूंनी दिली माहिती

अंपगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. यानिर्णयाबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारही मानले. एकनाथ शिंदे हे आता खऱ्या अर्थाने अपंगांचे नाथ ठरतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच अपंग मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य असल्याचेही ते म्हणाले. याबाबत त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली.

संजय राऊतांच्या सुटकेनंतर उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “न्यायालयच बुडाखाली घेण्याचा प्रयत्न…”

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांना काल जामीन मिळाल्यानंतर आज ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीका केली. केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत असल्याचे ते म्हणाले.“संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. तसेच खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक आणि माझे मित्रही आहेत. त्यांची जामीनावर सुटका झाली त्यांचा मला आनंद झाला आहे. मात्र, काल न्यायदेवतेने जो निर्णय दिला आहे, मी न्यायालयचे आभार मानतो. या निकालपत्रात न्यायालयाने परखड आणि अत्यंत स्पष्टपणे काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्यामुळे आता हे जगजाहीर झालं आहे की, केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागतात आहेत. ज्यांच्या अंगावर जा म्हटलं त्यांच्या अंगावर जातात. बेकायदेशीरपणे वागत असल्याचे संपूर्ण देशाने, जगाने बघितले आहे”, अशी प्रतिक्रिया उद्दव ठाकरे यांनी दिली.

“जग फिरून झालं असेल तर…”, राजू शेट्टींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ ही पदयात्रा सुरु आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा असा प्रवास करत ही यात्रा महाराष्ट्रात आली आहे. १४ दिवस ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात प्रवास करणार आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेते नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला लगावला आहे. जग फिरून झालं असेल, तर पंतप्रधान मोदींनी देशात यात्रा काढावी, असे शेट्टी यांनी म्हटलं आहे.राजू शेट्टी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “मी स्वत: अनेक पदयात्रा काढल्या आहेत. पदयात्रेमुळे जनतेशी थेट संपर्क येत असून, त्यांच्या समस्या जाणून घेता येतात. अनुभव वाढवणाऱ्या या पदयात्रा असतात. त्यामुळे पदयात्रा कोणीही काढू त्याचं स्वागत केलं पाहिजं,” असेही राजू शेट्टी यांनी म्हटलं.

मोरबी पूल दुर्घटनेत लोकांचे जीव वाचविणाऱ्याला भाजपाने दिली उमेदवारी; विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने राज्यातील एकूण १८२ पैकी १६० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीतून काही दिग्गजांची नावे गायब आहेत, तर काही नव्या उपेक्षित चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे. भाजपाने गुजरात विधानसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये नुकत्याच झालेल्या मोरबी येथील केबल पूल दुर्घटनेचे पडसाद पडल्याचं देखील दिसून आलं आहे.

कारण भाजपाने उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये मोरबी पूल दुर्घटनेमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरुन लोकांची जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कांती अमृतिया यांना उमेदवारी दिली आहे. गुजरातमधील पूल कोसळल्याच्या हृदयद्रावक दुर्घटनेदरम्यान कांती अमृतिया हे लोकांना वाचवण्यासाठी नदीपात्रात उतरले होते. त्यांचा पाण्यात उतरुन लोकांना मदतकार्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांचे हेच मदतकार्य त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी जीवनदायी ठरलं आहे.

मालदीवमध्ये विदेशी कामगारांसाठी बांधलेल्या घरांना भीषण आग, १० जणांचा मृत्यू; नऊ भारतीयांचा समावेश

मालदीवची राजधानी माले येथे गुरुवारी विदेशी कामगारांच्या घरांना लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये नऊ भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. मालदीवमधील भारतीय उच्चयुक्त कार्यालयाकडूनही याबाबतचे एक ट्वीट करण्यात आले असून त्यांनी मदतीसाठी फोन नंबरही दिले आहेत. दरम्यान, आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

 ‘शिंदे-भाजपचे काही निर्णय चांगले’, जेलमधून आल्यानंतर संजय राऊत नरमले?

मागच्या 100 दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये असलेल्या संजय राऊत यांना बुधवारी जामीन मिळाला, यानंतर ते आर्थर रोड जेलमधून बाहेर आले. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. या भेटींनंतर संजय राऊत नरमले का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

आज शरद पवारांची भेट घेतली. पवार साहेबांनी माझी आणि माझ्या कुटुंबियांची चौकशी केली, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसंच राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही भाजपविरोधात नाही. ही यात्रा देशातील सर्व लोकांना एकत्र जोडण्याची आहे. भारत जोडो एक आंदोलन आहे. या देशातली कटुता नष्ट करण्यासाठी ही यात्रा आहे. भाजपने सुद्धा या यात्रेचं स्वागत करावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

राहुल गांधींसह सुप्रिया सुळेंचीही जादू, भारत जोडो यात्रेला गर्दीच गर्दी

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यातील नांदेड शहरातून जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत या यात्रेत राष्ट्रवादीचे नेतेही सामील झाले आहे. सुप्रिया सुळे यांनीही भारत जोडो यात्रेत हजेरी दर्शविली आहे. याशिवाय जयंत पाटीलदेखील यात्रेत दिसत आहे. जितेंद्र आव्हाडदेखील या सभेत दिसत आहे.

गुरुद्वारेत गेल्यानंतर नेतेमंडळी यात्रेत सहभागी झाले. आजची सभा ही विशेष आहे. अशोक चव्हाणांनी या सभेसाठी जंगी तयारी केली होती. या यात्रेच्या माध्यमातून ते आपल्या मुलीचं राजकीय पदार्पण करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नांदेडमध्ये बॅनरबाजी केली जात होती. भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील हा चौथा दिवस आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.