दक्षिण कोरियाचा नेटफ्लिक्स ओरिजिनल ड्रामा ‘स्क्विड गेम’ (squid game) जागतिक स्तरावर लोकप्रिय झाला आहे. 17 सप्टेंबर रोजी रिलीज झालेली ही वेब सीरीज अवघ्या दोन आठवड्यांत नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिली जाणारी सीरीज बनली. अखेर या लहान मुलांच्या खेळावर आधारित या वेब सीरीजमध्ये असे काय आहे की, अवघ्या जगाला त्याची चटक लागली आहे, चला तर जाणून घेऊया या सीरीजची नेमकी कथा काय आणि या क्रूर खेळला लोकांची का पसंती मिळत आहे….
दक्षिण कोरियाचे दिग्दर्शक ह्वांग डोंग-ह्युक यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘स्क्विड गेम’ या वेब सीरीजमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एकूण 456 लोकांसह खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेची कथा यात दाखवण्यात आली आहे. हे सर्व लोक कर्जातून बाहेर पडण्यासाठी एका खेळाचा भाग बनतात, ज्यामध्ये त्यांना लहान मुलांचे काही खेळ खेळावे लागतात. जर कोणी हा गेम जिंकला तर त्याला 45.6 अब्ज दक्षिण कोरियन वॉन (सुमारे 300 कोटी रुपये) मिळतील. पण या खेळात एक मोठा ट्विस्ट आहे, पण या लोकांना त्याबद्दल कल्पनाच नाहीये…
जो व्यक्ती खेळातून बाहेर पडेल त्याला खेळाचा निरोप तर घ्यावा लागेलच, पण त्याला या जगाचाही निरोप घ्यावा लागेल, असा एक मोठा ट्विस्ट आहे. होय, या गेममध्ये एलिमिनेशन म्हणजे आपला जीव गमावणे हा नियम आहे. एकदा का व्यक्तीने या गेममध्ये प्रवेश केला की, त्याला परत जाण्याचा किंवा मागे फिरण्याचा कोणताही मार्ग नाही!
‘स्क्विड गेम’ वेब सीरीजमध्ये एकूण नऊ भाग आहेत, ज्यामध्ये 6 जीवघेणे खेळ आहेत. यातील पहिला खेळ म्हणजे ‘रेड लाईट ग्रीन लाईट’ ज्याला आपण भारतात ‘स्टॅच्यू गेम’ म्हणून ओळखतो. पहिल्याच खेळत तबल अर्ध्याहून अधिक लोकांना अर्थात स्पर्धकांना आपला जीव गमवावा लागतो. दुसरा ‘द मॅन विथ द अंब्रेला’ या खेळामध्ये स्पर्धकांना साखरेच्या पाकापासून बनवलेली कँडी दिली जाते, ज्यावर एक आकार असतो तो कोरून बाहेर काढायचा असतो.
तिसरा ‘टग ऑफ वॉर्स’ अर्थात रस्सी खेचाची स्पर्धा, चौथा गगनबू अर्थात गोट्यांचा खेळ, पाचवा ग्लास स्टेपिंग स्टोन्स ज्यामध्ये खेळाडूला काचेचा पूल ओलांडून पलीकडे जावे लागते. सहावा आणि शेवटचा गेम म्हणजे स्क्विड गेम ज्यामध्ये दोन स्पर्धकाला अंतिम रेषेपर्यंत जाण्यापासून दुसऱ्याला अडवायचे असते.
वरील पहिल्या पाच गेममध्ये, खेळाडू एकमेकांशी कोणत्याही प्रकारचे हिंसक वर्तन करू शकत नाहीत. खरं तर अशी कोणतीही संधी या खेळात नसते, परंतु स्क्विड गेममध्ये असे नाही. या गेममध्ये खेळाडू गेम जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. कथेच्या सुरुवातीला या खेळाबद्दल थोडीशी सूचनाही दिली आहे.