केंद्र सरकारमधील सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी आता पुन्हा एकदा बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून सोमवारी याबाबत माहिती देण्यात आली. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मधल्या काळात बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात करण्यात आली होती. पण आता ती पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान, बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर असणं बंधनकारक असेल हे संबंधित विभाग प्रमुखांची जबाबदारी असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आपली हजेरी लावण्यापूर्वी सॅनिटायझरने हात साफ करणं गरजेचं असणार आहे.
यापूर्वी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बायोमेट्रिक हजेरी लावण्यापासून सूट देण्यात आली होती. कार्मिक मंत्रालयाने केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालय आणि विभागांना दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, बायोमेट्रिक मशीनवर आपली हजेरी लावताना प्रत्येक कर्मचाऱ्याने आपसांत 6 फुटाचं अंतर राखणं गरजेचं आहे. जर एखाद्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असेल आणि हजेरीसाठी गर्दी होत असेल तर अतिरिक्त बायोमेट्रिक मशीन लावण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मार्च 2020 पासून बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली होती. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची रजिस्तरवर हस्ताक्षर करुन हजेरी घेतली जात होती. जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका असलेल्या सर्वच वस्तू किंवा घटकापासून लांब राहण्याच्या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, 2014 मध्ये केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्रालय आणि सरकारी विभागात बायोमेट्रिक मशीनद्वारे हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. वेळ आणि कामाची शिस्त लावण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयाचं तेव्हा जोरदार स्वागत करण्यात आलं होतं.