पाकिस्ताननं न्यूझीलंडला हरवून टी20 वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली आहे. आता भारत किंवा इंग्लंड या दोनपैकी एक टीम फायनलमध्ये पाकिस्तानशी भिडणार आहे. उभय संघातला टी20 वर्ल्ड कपमधला सेमी फायनलचा दुसरा सामना गुरुवारी होणार आहे. पण या सामन्याआधी नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूनं लागतो हे निर्णयक ठरणार आहे. कारण अॅडलेड ओव्हलवर टॉसचं आणि सामन्याच्या निकालाचं एक वेगळंच गणित आहे.
अॅडलेड आणि टॉस
आतापर्यंत ऑस्ट्रेलियातल्या अॅडलेड ओव्हल मैदानावर 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. पण आश्चर्याची गोष्ट ही की यातल्या प्रत्येक सामन्यात टॉस जिंकलेल्या टीमचा पराभव झाला आहे. त्यामुळे अॅडलेड ओव्हलवर मॅच जिंकण्यासाठी एका अर्थानं रोहित शर्मानं टॉस न जिंकलेलच बरं. महत्वाची बाब ही की भारताचा बांगलादेशविरुद्धचा सामना अॅडलेडच्या मैदानातच झाला होता. त्या मॅचमध्ये पहिल्यांदा रोहित टॉस हरला आणि भारतानं ती मॅच जिंकली.
टॉसचा बॉस… रोहित शर्मा
दरम्यान यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मानं 5 पैकी 4 वेळा टॉस जिंकला आहे. त्यानं केवळ अॅडलेडवरच्या सामन्यातच टॉस गमावला होता. पण आता पुन्हा एकदा इंग्लंडविरुद्ध अॅडलेडच्या मैदानात रोहितनं टॉस जिंकू नये असं चाहत्यांना वाटत आहे.
अॅडलेडचं मैदान विराटसाठी लकी
अॅडलेड ओव्हलचं मैदान विराटसाठी नेहमीच लकी मानलं जातं. इथे विराटनं दोन टी20 मॅचमध्ये 154 धावा केल्या आहेत. तर तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून अॅडलेडवर 907 धावा विराटच्या खात्यात जमा आहेत. त्यामुळे अॅडलेडवर इंग्लंडविरुद्ध विराट आणखी एक मोठी खेळी करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान या वर्ल्ड कपमध्ये विराटनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यानं आतापर्यंत 5 मॅचमध्ये 246 धावांचा पाऊस पाडला आहे.