शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी जामीन मिळाला आहे. 100 दिवसानंतर संजय राऊत जेलमधून बाहेर आले आहेत. संजय राऊत यांना जामीन मंजूर होताच शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. संजय राऊतांचं जेलबाहेर स्वागत करण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत सिद्धीविनायक मंदिरात गेले. यानंतर त्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं.
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संजय राऊत यांच्यासोबत शिवसेना नेते आणि शिवसैनिकही उपस्थित होते. संजय राऊत यांच्या जामिनानंतर सुरू असलेल्या जल्लोषावर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे.
जामीन झाला काय किंवा इतर बाबी झाल्या काय, यावर आम्हाला बोलायचं नसतं. जो निर्णय आला तो मान्य करायला हवा. खुनाच्या आरोपीलाही जामीन मिळतो, त्यांना त्यांच्या परीने आनंद साजरा करू द्या. आम्ही आमच्या परीने काय करायचं ते करू. आम्ही आताच काही सांगत नाही,’ असा निशाणा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी साधला आहे.