देशांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असतानाच देशातील दहा जिल्हे हॉटस्पॉट ठरले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. दहा जिल्ह्यांमध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अकोला, जळगाव यांचा समावेश आहे. कर्नाटकमधील बेंगळूरु शहराचाही या दहा जिल्ह्यांमध्ये समावेश असून, त्यात बहुतांश उपचाराधीन रुग्ण आहेत.
देशातील कोरोनाबळींपैकी ८८ टक्के मृत्यू हे ४५ वर्षांवरील व्यक्तींचे आहेत. या वयोगटातील मृतांचे प्रमाण हे सरासरीपेक्षा (१.३७ टक्के) अधिक म्हणजे २.८५ टक्के असल्याने या वयोगटातील व्यक्तींना प्राधान्याने लशीद्वारे कोरोनापासून संरक्षण देण्यात येत असल्याचे राजेश भूषण यांनी स्पष्ट केले.
लोणावळा, खंडाळ्यात निर्बंध…
कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होळी आणि धुळवडीस जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे. त्यामुळे यंदा लोणावळा, खंडाळा, पानशेत, खडकवासला धरण परिसर आणि जिल्ह्यांतील अन्य पर्यटनस्थळी हा उत्सव साजरा करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
होळीसाठी नियमावली…
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा होळीचा सण रंगांची उधळण न करता साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास गृह विभागाने बंदी घातली असून, कोकणात घरोघरी पालखी नेण्यास मनाई करण्यात आली आहे. होळी व धूलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर मोठया संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही, अशा कार्यक्रमाचे किंवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आदेश ठाणे पालिकेनेही दिले आहेत.