गृहमंत्री देशमुख म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मध्यरात्री ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. अनिल देशमुख यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्वरित चौकशी करण्याची विनंती केली आहे. अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आलेल्या पत्राचा फोटोही ट्विटमध्ये जोडला आहे.

अनिल देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे की, “मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते,” असं अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे.

काय म्हटलं आहे पत्रात “राज्य शासनाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना १७ मार्च २०२१ रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप लावलेत त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे मी आपणांस विनंती करतो की, त्यांनी जे आरोप लावले आहेत या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करुन ‘दूधका दूध पानीका पानी’ करावे,” असं अनिल देशमुखांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं-

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका दाखल करुन घेण्यास नकार देत उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. गृहरक्षक दलात केलेली बदली अन्यायकारक असून ती रद्द केली जावी तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित खंडणीवसुलीची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी परमबीर सिंह यांनी याचिकेत केली होती.

परमबीर सिंह यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायायलात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातील सर्व आरोपांचा उल्लेख त्यांनी याचिकेत केला होता. सुप्रीम कोर्टाने सुनवाणी दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असताना त्यांना पक्षकार का केलं नाही ? अशी विचारणा केली. तसंच यावेळी त्यांनी ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना सीबीआय चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात का जात नाही? अशी विचारणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.