चिखलदरा परिसरात पहाटे पारा 5 ते 6 अंशांपर्यंत घसरला

अमरावती जिल्ह्यातील विदर्भाचे नंदनवन असलेल्या पर्यटननगरी चिखलदरा (Chikhaldara) व परिसरात पहाटे पारा 5 ते 6 अंशांपर्यंत खाली घसरला. त्यामुळं कडाक्याची थंडी मेळघाटवासीयांनी (Melghat) अनुभवली. या कडाक्याच्या थंडीतही पर्यटकांचा उत्साह मात्र कायम दिसून आलाय. सध्या थंडीची लाट आली असून, अमरावती शहर व ग्रामीण भागातही थंडीमुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे.

अमरावतीच्या तुलनेत उंचावर असलेल्या चिखलदरा व परिसरात नेहमीच थंडी अधिक राहते. दरम्यान, सोमवारी सकाळी चिखलदरा व परिसरात पाऱ्याने तर यंदाच्या वर्षातील आतापर्यंतचा नीचांक गाठला आहे. आतापर्यंत पारा 5 ते 6 अंशांपर्यंत खाली घसरला नव्हता. कडाक्याच्या थंडीमुळं चिखलदऱ्यात दिवसभर प्रत्येकाच्या अंगात ऊब देणारे कपडे व काही ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसून आले. बोचरी थंडी असल्यामुळे थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक चिखलदऱ्यात पोहोचले आहेत. थंडीत पर्यटकांचा उत्साह दिसून आला.

आणखी दोन दिवस पारा 10 अंशांच्या खालीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. मंगळवारी सकाळी सात वाजता सात अंश तापमानाची नोंद झाली होती. तर परिसरातील माखला व बरमासती परिसरात 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती शहराचे तापमान 7.7 नोंदविले गेले. यामुळं सातपुडा पर्वतरांगेत वसलेला मेळघाट पूर्णता गारठला आहे. कुडकुडत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक घराबाहेर गरम कपडे अंगावर घालताना दिसत आहेत.

सकाळी किंवा संध्याकाळी लोक घराबाहेर निघणे टाळतात. तर थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून दुपारी शेकोट्या पेटविल्या जात असल्याचं चित्र आहे. आदिवासी नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी चुलीजवळ आश्रय घेतात. गेल्या चार दिवसांपासून थंडीमुळं पर्यटकांच्या संख्येतही घट झाली आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या बारा वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात थंडी पडली नव्हती. यंदाची थंडी ही गेल्या बारा वर्षातली रेकॉर्ड ब्रेक थंडी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.