आज दि.१६ डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

सरकारचं तुमच्या आरोग्यावर लक्ष! आतापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त पुरुषांची तपासणी

‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ अभियानाअंतर्गत आतापर्यंत १ कोटी ५९ लाख पेक्षा अधिक पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून १८ वर्षांवरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी १७ सप्टेंबरला हे अभियान सुरु करण्यात आले. या अभियानाअंतर्गत राज्यातील सुमारे ४ कोटी ६७ लाख पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागामार्फत ठेवण्यात आले आहे.या अभियानाअंतर्गत १६ डिसेंबरपर्यंत १८ वर्षांवरील १,५९,५१,४०९ पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यापैकी १,५०,०७,७७५ लाभार्थ्यांच्या आवश्यक त्या चाचण्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आलेल्या असून, त्यापैकी २१,८५,७०३ लाभार्थ्यांना औषधोपचार देण्यात आलेले आहेत. तर जवळपास १८,८०१ लाभार्थ्यांवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या आहेत. ही मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार असून, त्यानंतर गरजेनुसार मोहिमेचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

विरोधी पक्षांकडून नेहमीच नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली जाते आणि सत्ताधारी मात्र त्याला गांभीर्याने घेत नाही, असा गेल्या काही वर्षांत आलेला अनुभव. आता पुन्हा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान दोन दिवस वाढवा, अशी मागणी केली आहे. १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनुसार विदर्भ प्रांत समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे नागपूरने राजधानीचा दर्जा गमावला. त्यापूर्वी, २८ सप्टेंबर १९५३ मध्ये नागपूर करार करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनाचे एक अधिवेशन वर्षातून एकदा तरी नागपुरात घेण्यात यावे, अशी तरतूद करण्यात आली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. करारानुसार १९६० च्या पहिल्या अधिवेशनाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात आले. ते आजतागायत तिथे भरवले जाते.

धोम धरणाचा डावा कालवा फुटला, हजारो क्युसेक्स पाणी व ऊसतोड मजुरांच्या झोपड्या वाहून गेल्या

धोम धरणाचा (ता. वाई) डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटला. मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. यामुळे झोपेत असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांत पाणी शिरून त्यांचे संसारपयोगी साहित्य व बैल वाहून गेले. वाहून जाणारे बैल वाचवण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे, प्रशासन अधिकारी, किसन वीर कारखान्याचे पदाधिकारी, लगतच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली.

श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा : विश्व हिंदू परिषदेतर्फे घरोघरी ‘भाव जागरण’

अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते ‘मंदिरनिर्माण से राष्ट्रनिर्माण’ असा संदेश देत १ ते १५ जानेवारीदरम्यान घरोघरी निमंत्रणाच्या अक्षता देणार आहेत. पाच लाख नोंदणीकृत मंदिरांवर रोषणाई, दहा दिवस दीपोत्सव, प्रत्येक मंदिरात रामरक्षा, रामनामाचा जप आदी कार्यक्रमही यानिमित्ताने आयोजित करण्यात येणार आहेत.रा. स्व. संघ परिवाराच्या वतीने सेवा प्रकल्प सुरू असणाऱ्या वस्त्यांमध्ये आवर्जून निमंत्रणे दिली जाणार आहेत. त्यासाठी एक ते दीड लाख कार्यकर्ते कामाला लागले आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच मंदिर विश्वस्तांनी आपल्या मालकीच्या जागा अहिंदूंना देऊ नये, अशा सूचनाही विश्व हिंदू परिषदेने केल्या आहेत. भाव जागरणाचे असे कार्यक्रम ठरावीक अंतराने घेतले जातात. ज्यांनी अशा उपक्रमात सहभाग घेतला, त्यांना एखादे काम पूर्ण होत असताना निमंत्रण देण्याचा भाव असावा, म्हणून अक्षता घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला जाणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

केरळमध्ये आढळला करोनाचा नवा उपप्रकार, लसीकरण झालेल्यांनाही JN.1 चा धोका!

देशात करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोविडचा सबव्हेरियंट असलेल्या BA.2.86 च्या जातीतील JN.1 चा विषाणू केरळच्या काही भागांमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाची चिंता निर्माण झाली आहे. तसंच, हा विषाणू वेगाने पसरणारा असल्याचीही माहिती समोर आली आहे.The India SARS-CoV-2 Genomics Consortium या प्रयोगशाळेने केरळमध्ये हा विषाणू शोधला आहे. INSACOG चे अध्यक्ष एन. के. अरोरा म्हणाले, हा विषाणू नोव्हेंबरमध्ये आढळला होता. हा विषाणू BA.2.86 चा उपप्रकार आहे. तसंच, JN.1 विषाणूचे काही बाधित रुग्णही केरळमध्ये सापडले आहेत.

‘इंडिया’ महाआघाडीची बैठक १९ डिसेंबरला

आगामी लोकसभा निवडणुकीची रणनिती निश्चित करण्यासाठी विरोधकांच्या ‘इंडिया’ महाआघाडीची बैठक १९ डिसेंबरला दिल्लीमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी ‘इंडिया’च्या सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.पाच विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर पहिल्यांदाच ‘इंडिया’तील नेते एकत्र येत असून दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजता बैठकीला सुरुवात होईल. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी एक दिवस आधीच दिल्लीत दाखल होणार आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशीही काँग्रेसच्या नेत्यांनी संपर्क साधला असून त्यांनीही बैठकीमध्ये सहभागी होण्यास होकार दिला आहे. 

तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ड्रायव्हिंग सीटवर, पाकिस्तानविरुद्ध घेतली ३०० धावांची आघाडी

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८७ धावा केल्या होत्या. त्याचवेळी पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात २७१ धावांवरच मर्यादित राहिला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २१६ धावांची आघाडी मिळाली. सामन्याच्या तिसर्‍या दिवशीचा (१६ डिसेंबर) खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ८४ धावा आहे. त्याची एकूण आघाडी ३०० धावांची झाली आहे. जेव्हा खेळ संपला तेव्हा स्टीव्ह स्मिथ नाबाद ४३ आणि उस्मान ख्वाजा नाबाद ३४ धावांवर खेळत आहेत.दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही. खुर्रम शहजादने त्याला इमाम उल हककरवी झेलबाद केले. मार्नस लाबुशेन केवळ दोन धावा करता आल्या. खुर्रमने त्याची विकेट घेतली.

वर्षाच्या अखेरीस एलआयसी एजंट्ससाठी खुशखबर! एलआयसीने ग्रॅच्युईटीची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली

भारतीय आयुर्विमा महामंडळ ( एलआयसी) ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. कंपनी त्यांच्या एजंटना खुश करण्यासाठी नवनवीन गोष्टी करत असते. नुकताच एलआयसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. एलआयसीने एजंटसाठी ग्रॅच्युईटी ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये करण्याची सुचना जारी केली आहे.एलआयसी एजंट विनियम, २०१७ मध्ये सुधारणा करुन एलआयसी एजंट कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची मर्यादा ३ लाख रुपयांवरुन पाच लाख करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षाच्या अखेरीस एलआयसीने त्यांच्या एजंटना ही गोड बातमी दिली आहे.या अधिनियमाला एलआयसी एजंट दुरुस्ती विनियम, २०२३ म्हटले जाऊ शकते, असे या जारी केलेल्या अधिसुचनेत शुक्रवारी म्हटले आहे.

श्रेयसची प्रकृती आता स्थिर

अभिनेता श्रेयस तळपदेला १४ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्याचा आगामी चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’च्या शूटिंगनंतर घरी आल्यावर त्याने अस्वस्थ वाटत असल्याची माहिती पत्नीला दिली. त्याची पत्नी दीप्ती त्याला तत्काळ रुग्णालयात नेत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याने श्रेयसच्या प्रकृतीबद्दल अपडेट शेअर केली आहे.श्रेयसच्या कुटुंबातील सदस्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं की श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे आणि तो बरा होत आहे. “श्रेयस तळपदे आता बरा आहे. तो ठिक होत असून शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. आज सकाळी तो आमच्याकडे बघून हसला. त्यामुळे आम्हा सर्वांना दिलासा मिळाला आहे. तो स्वत: काही दिवसांत माध्यमांशी बोलेल,” अशी माहिती श्रेयसच्या कुटुंबातील सदस्याने दिली.

‘डंकी’ विरुद्ध ‘सालार’ या पार्श्वभूमीवर प्रभास घेणार किंग खानची भेट

‘अ‍ॅनिमल’ आणि ‘सॅम बहादुर’नंतर बॉक्स ऑफिसवर आणखी एक जबरदस्त मुकाबला पाहायला मिळणार आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ व दाक्षिणात्य स्टार प्रभासचा ‘सालार’ हे दोन्ही बिग बजेट चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. यावरून सध्या दोन्ही सुपरस्टार्सच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळत आहे. दोन्ही चित्रपटांना मिळणाऱ्या स्क्रीनवरुन सध्या चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत आहे.शाहरुख खानचा ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याने उत्तरेकडीन राज्यात शाहरुखच्या ‘डंकी’ला अधिक स्क्रीन देण्यात आल्या असल्याचं सांगितलं जात आहे. ‘पिंकव्हीला’च्या रीपोर्टनुसार उत्तरेकडील राज्यात शाहरुख खानच्या ‘डंकी’ला ४० टक्के शोज देण्यात आले असून ‘सालार’ला निव्वळ ३०% शोज देण्यात आले आहेत. तर हॉलिवूडपट ‘अॕक्वामॅन २’ला १२% शोज दिले गेले असून उर्वरित १०% शोज रणबीरच्या ‘अॕनिमल’साठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

स्क्रीन शेअरिंगच्या या आकडेवारीमुळे प्रभास नाराज आहे अन् लवकरच तो शाहरुखशी या संदर्भात भेट घेऊन काही तोडगा काढता येतो की नाही याबद्दल चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्ही चित्रपटांना ५०% स्क्रीन्स मिळायल्या हव्यात असा आग्रह प्रभासचा असल्याचा ‘झूम’च्या रीपोर्टमधून समोर आलं आहे. यासाठीच प्रभास शाहरुख खानची लवकरच भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.