वीर बाल दिनानिमित्त गुरू गोविंद सिंग यांच्या हुतात्मा पुत्रांना अभिवादन
‘‘देशवासीयांत न्यूनगंड निर्माण करण्यासाठी दुर्दैवाने इतिहासाच्या नावाखाली काल्पनिक कथा शिकवल्या जात आहेत,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. भारताला यशोशिखरावर पोहोचवायचे असेल तर भूतकाळातील संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
शीख गुरू गुरू गोविंदसिंग यांच्या पुत्रांचे हौतात्म्याबद्दल त्यांना आदरांजली व अभिवादन करण्यासाठी त्यांचा हौतात्म्यदिन ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जाणार आहे. सोमवारी येथील ‘मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम’मध्ये पहिल्या वीर बाल दिनानिमित्त आयोजित सोहळय़ात मोदी बोलत होते. यावेळी सुमारे ३०० मुलांनी सादर केलेल्या कीर्तनात मोदी सहभागी झाले. यंदा गुरू गोविंदसिंग यांच्या प्रकाशपर्वानिमित्त ९ जानेवारी रोजी केंद्र सरकारने साहिबजादा बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा ‘वीर बाल दिवस’ पाळण्याचे जाहीर केले होते.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमात सहभागी झाले होते. मोदींनी आपल्या धार्मिक श्रद्धांच्या रक्षणार्थ हुतात्मा झालेले गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र जोरावर सिंग व फतेह सिंग यांना आदरांजली वाहिली. मोदी म्हणाले, की हा दिवस आपल्या अभिमानास्पद भूतकाळाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व भविष्यासाठी प्रेरक म्हणून महत्त्वाचा आहे.
मोदी म्हणाले की, औरंगजेब व त्याच्या माणसांना तलवारीच्या जोरावर गुरु गोविंदसिंग यांच्या पुत्रांचे धर्मातर करायचे होते. त्यांनी भारताच्या रुपांतराची कुटील योजना आखली होती. पण गुरू गोविंद सिंग या सर्वाविरुद्ध पहाडासारखे उभे राहिले. ज्या समाजाची व राष्ट्राची नवी पिढी अत्याचाराला बळी पडते, तिचा आत्मविश्वास व भवितव्य आपोआप नष्ट होते. पण हे भारतपुत्र मृत्यूपुढेही डगमगले नाहीत. या मुलांना भिंतीत जिवंत चिणण्यात आले. मात्र आपल्या हौतात्म्याने या पुत्रांनी अतिरेकी कुटील हेतूंना कायमचे दफन केले. त्यांच्या या महान शौर्यगाथेचे इतिहासात सोयीस्कर विस्मरण झाले. आताचा ‘नवा भारत’ काही दशकांपूर्वी करण्यात आलेल्या जुन्या चुका सुधारत आहे. इतिहासाच्या नावाखाली आपल्याला काल्पनिक कथा शिकवल्या गेल्या व आपल्यात न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आपल्या समाजाने व परंपरेने या गौरवगाथा विस्मृतीत जाऊ न देता जिवंत ठेवल्या.