पाकिस्तान- न्यूझीलंड कसोटी मालिका : बाबर, सर्फराजने पाकिस्तानला सावरले

पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडविरुद्ध ५ बाद ३१७ धावा

कर्णधार बाबर आझम (२७७ चेंडूंत नाबाद १६१) आणि सर्फराज अहमद (१५३ चेंडूंत ८६) यांच्या संयमी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३१७ धावा केल्या.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर अब्दुल्ला शफिकच्या (७) रूपात संघाला पहिला धक्का बसला. यानंतर, शान मसूदलाही (३) जास्त काही करता आले नाही. इमाम-उल-हकने (२४) काही चांगले फटके मारले, मात्र तो अधिक काळ मैदानावर टिकाव धरू शकला नाही. त्यामुळे संघाची अवस्था ३ बाद ४८ अशी बिकट झाली. यानंतर बाबरने सौद शकीलच्या (२२) साथीने संघाच्या धावसंख्येत भर घालण्यास सुरुवात केली. साऊदीने शकीलला बाद करत पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्या.

बऱ्याच काळानंतर कसोटी संघात पुनरागमन केलेल्या सर्फराजने बाबरच्या साथीने संयमाने खेळ करत संघाला सुस्थितीत पोहोचवले. दोघांनीही चौथ्या गडय़ासाठी १९६ धावांची निर्णायक भागीदारी रचली. एजाज पटेलने सर्फराजला बाद करत ही भागीदारी मोडीत काढली. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार लगावले. दरम्यान, बाबरच्या शतकी खेळीत १५ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे.

आगा सलमान (नाबाद ३) दिवसाचा खेळ संपला तेव्हा बाबरसह खेळत होता. न्यूझीलंडकडून एजाज पटेल (२/९१) आणि मायकल ब्रेसवेल (२/६१) यांनी गोलंदाजीत चुणूक दाखवली. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा प्रयत्न पाकिस्तानचा डाव लवकर संपवण्याचा असेल.

संक्षिप्त धावफलक

  • पाकिस्तान (पहिला डाव) : ९० षटकांत ५ बाद ३१७ (बाबर आझम नाबाद १६१, सर्फराज अहमद ८६; एजाज पटेल २/९१, मायकल ब्रेसवेल २/६१) वि. न्यूझीलंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.