सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमधून महाबळेश्वर आणि पाचगणी देखील सुटू शकलेली नाहीय. गेले अनेक महिने लॉकडाऊनमध्ये घालवल्यानंतर व्यापाऱ्याचं जगणं मुश्किल झालं आहे. त्यात आता पुन्हा जिल्हाचा पॉझिटिव्हिटी दर पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध जैसे थे ठेवल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत.
साताऱ्याचा कोरोना संसर्ग दर वाढ पाहता जिल्हाधिकारी शेखर निकम यांनी जिल्ह्यासह पाचगणी महाबळेश्वर पर्यटन स्थळीही निर्बंध जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने जिल्ह्यातील व्यापारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. पर्यटन स्थळ असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी मध्येही हीच नियमावली लागू केली असल्यामुळे या ठिकाणच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन पाचगणी महाबळेश्वर पर्यटन स्थळ असल्याने माथेरान सारखी वेगळी नियमावली जाहीर करा अशी मागणी केली आहे.
मात्र याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अशी कोणतीही नियमावलीचा आदेश सध्यातरी राज्य सरकारकडून आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाकडून आदेश आल्यानंतर पुढची पावलं उचलली जातील, असा पवित्रा घेत सध्यातरी वेट अँड वॉचची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
दुसरीकडे गेले अनेर महिने आम्ही लॉकडाऊनमध्ये व्यतित केले आहेत. लॉकडाऊन काळात शासनाच्या नियम अटी पाळून शासनाला सहकार्य केले आहेत. संसर्ग दर वाढीच्या काळात दुकानं बंद ठेऊन शासनाला साथ दिली. मात्र आता संसर्ग दर कमी होत असताना शासनाने आमचाही विचार करायला हवा… दुकाने जर सारखीच बंद ठेवायची तर आम्ही जगायचं कसं, आमच्यावर उपासमारीची वेळ आलीय, असं संतप्त भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.