थलैवा अर्थात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत सुद्धा कोविड पीडितांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. रजनीकांत यांनी आज मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत त्यांनी 50 लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे.
रजनीकांत यांनी आज दुपारी मुख्यमंत्री स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. रजनीकांत यांनी दिलेल्या या मदतीचं चित्रपट निर्माते रमेश बाला यांनी कौतुक केलं आहे. तामिळनाडूत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. अशावेळी रजनाकांत यांच्यासह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भरभरून मदत केली आहे. मदत देणाऱ्यांमध्ये वैत्री मारन आणि शिवकार्तिकेयन यांचाही समावेश असल्याचं बाला यांनी म्हटलं आहे.
रजनीकांत यांच्या आधी त्यांची कन्या सौंदर्या रजनीकांत आणि त्यांचे पती विशागन, सासरे व नणदेने 14 मे रोजी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती. यावेळी सौंदर्या यांनी कोरोना बाधितांच्या उपचारासाठी मुख्यमंत्र्यांकडे एक कोटी रुपयांचा धनादेश दिला.
दरम्यान, रजनीकांत यांनी नुकताच कोरोना व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांनी एका खासगी रुग्णालयात कोविशिल्डचा डोस घेतला होता. यावेळी त्यांची कन्या सौंदर्याही त्यांच्यासोबत उपस्थित होती. सौंदर्यानेच रजनीकांत यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतल्याची माहिती दिली होती.
रजनीकांत सध्या ‘अन्नाथे’ या सिनेमात व्यस्त आहेत. या सिनेमाचं चित्रीकरण करून ते 13 मे रोजीच हैदराबादहून चेन्नईला घरी परतले. हैदराबादमध्ये रामोजीराव फिल्म सिटीत ते अन्नाथेचं चित्रीकरण करत होते. या सिनेमात रजनीकांत यांच्याशिवाय नयनतारा, किर्ती सुरेश, प्रकाश राज, आणि मीना खुशबू यांची भूमिका आहे. हा कॉमेडी सिनेमा आहे. या चित्रपटाची त्यांचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. येत्या 4 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.