इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी प्रमुख डॉ. के.के. अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. डॉ. के.के. अग्रवाल हे नाव भारतीय वैद्यकक्षेत्रात सुपरिचीत होते. आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
गेल्यावर्षी देशात कोरोनाची साथ आल्यापासून डॉ. अग्रवाल हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने प्रबोधनाचे काम करत होते. त्यांचे माहितीपूर्ण व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही व्हायचे. डॉ. अग्रवाल यांनी कोरोन लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. परंतु, सोमवारी रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर कुटुंबीयांनी डॉ.अग्रवाल यांच्याच ट्विटर अकाऊंटवरून एक निवेदन प्रसिद्ध केले.
डॉ. अग्रवाल यांनी वैद्यकीय पेशात आल्यापासून कायम समाजकल्याण आणि आरोग्यविषयक प्रबोधनाचे कार्य केले. कोरोनाच्या संकटकाळातही लोकांची भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी अनेक माहितीपूर्ण व्हीडिओ तयार केले होते, असे या निवेदनात म्हटले आहे.