राजकीय कार्यक्रमांना गर्दी कशी चालते, गणेशोत्सव का नको? राज ठाकरे यांचा संवाल

तुमच्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडी सरकारला केला आहे.

पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पुण्यात आले आहेत. पुण्यातील आठ मतदारसंघातील पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा सवाल केला. सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असा सवाल करतानाच गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळं ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू, असं राज म्हणाले.

यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट केली. निवडणुका स्थगित ठेवल्या पाहिजे. पण काम पटकन होणार असेल तर स्थगिती मान्य आहे. सरकारच्या फायद्याचं असेल म्हणून आता निवडणुका घेतल्या जात नसतील. यात काही काळंबेरं असेल तर तेही समजून घ्यायला पाहिजे. सरकारलाच या निवडणुका नको आहेत आता. कारण नंतर सरकारच महापालिका चालवणार. कारण त्यावर प्रशासक नेमणार आणि सरकारच सर्व काम बघणार. हे सर्व उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत. नुसता ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असं नको. पण जनगणना वगैरे झाल्यावर निवडणुका घ्यायला काही हरकत नाही, असं राज म्हणाले. सरकारकडे यंत्रणा आहे. त्यामुळे मनात आणलं इम्पिरिकल डेटा किंवा जनगणना हे सर्व होऊ शकतं. ती काही कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

या लॉकडाऊनमुळे जे चाललं ते बरं चाललं असं सर्व सरकारला वाटतंय. आंदोलने नाही, मोर्चे नाही, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, रस्त्यावर कुणी उतरायचे नाही. काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा. बरं चाललंय सरकारांचं. केवळ कोरोनाची भीती दाखवली जात आहे. तिसरी चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?, असा सवालही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी शाळा सुरू करण्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुलांचं लसीकरण झालं नाही. पुनावालांचंही स्टेटमेंट आहे. पण लसीकरण पूर्ण झालं नसेल तर शाळा कशा उघडणार? लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.