आज आहे वर्षातली पहिली मंगळागौर ; काय आहे या व्रताचं महत्व आणि पूजा विधी

श्रावण महिना हा सण, उत्सव आणि व्रतवैकल्याचा महिना मानला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला जास्त महत्व  आहे. श्रावणात सातही वारांना महत्व आहेत. या पवित्र महिन्याची वाट वर्षभर पाहिली जाते. श्रावण महिना नवविवाहीतांसाठी खास असतो. तसं वर्षभर नवीन लग्न झालेल्या मुलीचं कौतुक केलं जातं. पण, श्रावण महिन्यात नव विवाहित मुली आपल्या माहेरी जाऊन मंगळागौरीचं व्रत करतात. यावर्षी श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळागौरी पूजनाला  सुरुवात झाली आहे.

पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिवपार्वतीचा आशिर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती. तिचं पूजन केलं जातं.

महिलांसाठी हा सण खास असतो. लग्नानंतर सलग 5 वर्षे मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे. मंगळागौरीला महिला एकत्र येत नवविवाहितेचं कोडकौतुक करण्यासाठी विविध खेळ, गाणी, फुगडी घालू आनंद साजरा करतात. त्यामुळे महिलांनाही रोजच्या कामांमधून थोडासा विरंगुळा मिळतो.

मंगळागौरीचं व्रत

 सकाळी स्नान केल्यानंतर सोवळं नेसून, ही पूजा केला जाते. सर्वातआधी विघ्नहर्ता गणपतीची पूजा केली जाते. लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. शेजारी शिवपिंड, समोर कणकेचे दिवे अशी आरास सजवण्यात यावी. मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगलागौरीचं आवाहन करावं.

देवीला विविध पत्री, फुलं वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. मंगळागौरीची कहाणी वाचावी. महानैवेद्य अर्पण करावा.

16 दिव्यांनी आरती करावी. यानंतर षोडशोपचार पूजा करताना अखंड सौभाग्य प्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्या करता देवीला 3 अर्घ्य द्यावीत. 

मंगळागौरीसाठी महिलांना आमत्रंण द्यावं. त्यांना भोजन, हळदि-कुंकू द्यावं.

संध्याकाळी आरती करावी. रात्रभर जागरण करावं. सुवासिनी महिला फुगड्या, झिम्मा, खेळत,गाणी गात मंगळागौर जागवतात. साधी फुगडी, एका हाताची फुगडी, कंबर फुगडी, गुडघ्याची फुगडी, बस फुगडी, भुई फुगडी असं फुगडीचे अनेक प्रकार खेळले जातात.

झिम्मा, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, दोडका कीस, कोंबडय़ाचे तीन-चार प्रकार, सासू-सुनेचं अथवा सवतींचं भांडण असे खेळ रंगतात. 

अशा प्रकारे आनंदाने हा दिवस साजरा होतो. सलग 5 वर्षे हे व्रत करावं. गेल्यावर्षी कोरोनामुळे नवविवाहितांचा काहीसा हिरमोड झाला होता.

पण, यावेळी नियम थोडे शिथिल झाले आहेत, त्यामुळे कमी गर्दीत हा सण साजरा होईल.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. sdnewsonline.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.