पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 18 वा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमात 50 पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांना आणि 59 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देण्यात आले. त्यामध्ये जिल्हा सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद अब्दुल रझाक आवटी यांचाही समावेश आहे. आवटी यांना कायदा विषयातील डॉक्टरेट प्रदान करण्यात आले. लहानपणापासून आलेलं अपंगत्व जगणं म्हणून स्वीकारलेल्या आवटी यांचा आजवरचा प्रवास प्रेरणादायी आहे.
या प्रमुख कार्यक्रम प्रसंगी आवटी हे त्यांच्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. सर्व कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर त्यांच्या यशाचा आनंद होता. त्यांच्या 92 वर्षाच्या आई शहाजान यांना सुद्धा आपल्या मुलाने गाठलेल्या उत्तुंग यशाचे कौतुक वाटत होते. हे सर्व यश त्यांनी आपल्या आईच्या चरणी वाहून आईचा आशीर्वाद घेतला.
काय आहे यशाचा मंत्र?
न्या. आवटी यांनी यावेळी त्यांच्या आजवरच्या वाटचालीबद्दल बोलताना यशाचा मंत्र सांगितला. ‘आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी सोडू नये. ध्येयाशी प्रामाणिक राहून आपले स्वप्न पूर्ण केले पाहिजे. माझे संपूर्ण शिक्षण हे एलएलबी, एल. एम. पर्यंत झाले आहे. कुणीही आयुष्यात नकारात राहून विचार करू नये. माझ्याकडे पाहिलं तर तुम्हाला हे समजेल. मला सहा महिन्याचा असताना अपंगत्व आले. पण, आज सोलापूर जिल्ह्याचा सत्र न्यायाधीश म्हणून मी काम पाहत आहे . हे फक्त माझ्या प्रामाणिकतेमुळेच शक्य झाले आहे.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अपयशाकडं यशाची पहिली पायरी म्हणून पाहावं. तुमच्या स्वप्नांच्या दिशेनं वाटचाल कायम ठेवावी, अशी माझी सर्वांना विनंती आहे. मला ही डीग्री प्रदान केल्याबद्दल मी विद्यापीठाचा आभारी आहे,’ अशी भावना आवटी यांनी व्यक्त केली.पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनीही आवटी यांचं या यशाबद्दल कौतुक केलं. ‘तुमची प्रेरणा विद्यापीठात कायम राहिल, असं फडणवीस यावेळी म्हणाल्या.